दुबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी परदेशातून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. सपा आणि बसपाने आम्हाला अंडरइस्टिमेट केलंय. या निर्णयाअगोदर त्यांनी आमच्याशी चर्चाही केली नाही, असं राहुल गांधी एका हिंदी चॅनलशी बोलताना म्हणाले.
उत्तर प्रदेशातील सपा आणि बसपाची युती हा राजकीय निर्णय असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांनी युतीचा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. हा एक राजकीय निर्णय आहे आणि आम्ही याचा आदर करतो. मायावती, अखिलेश आणि मुलायम सिंग यादव यांचा मी आदर करतो. पण आम्हाला आमचं काम करावंच लागेल. आम्ही सर्व ठिकाणी निवडणूक लढू, असं राहुल गांधी म्हणाले.
सपा – बसपाचा फॉर्म्युला
आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा दोघेही 38-38 जागा लढवणार आहेत. तर इतर पक्षांना 4 जागा सोडणार आहेत. त्यापैकी अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या आहेत. अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. त्यामुळे या दोन जागांवर सपा-बसपा उमेदवार मैदानात उतरवणार नाही.
उत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघ
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. इथे लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यूपीमध्ये तब्बल 72 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा सपा-बसपाने एकत्र येत भाजपला रोखण्याचं ठरवलं आहे.
राहुल गांधी परदेशातून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. राफेल प्रकरण असो किंवा सीबीआयमधून आलोक वर्मा यांची हकालपट्टी असो, राहुल गांधींनी संयुक्त अरब अमिरातीमधून मोदी सरकारला घेरण्याचं धोरण आखलंय. राफेल व्यवहारात मोदींनी अनिल अंबानींच्या कंपनीला 30 हजार कोटींचा फायदा मिळवून दिला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.