नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांच्या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून उमेदवार जाहीर केलाय. काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी उपसभापती शामलाल यादव यांच्या कन्या शालिनी यादव यांना सपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. इथे काँग्रेसकडून पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधींना सपा-बसपाच्या पाठिंब्याने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. पण त्याअगोदरच सपाने उमेदवार जाहीर केलाय.
सपा आणि बसपाने अमेठी आणि रायबरेलीत अनुक्रमे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. वाराणसीत मोदींविरोधात काँग्रेसला तोडीस तोड उमेदवाराची आवश्यकता आहे. प्रियांका गांधींना इथून उमेदवारीची चर्चा होती. पण त्याअगोदर सपा आणि बसपाकडे पाठिंब्याची मागणी केली जाणार असल्याची चर्चा होती. अखेर सपाने स्वतःचा उमेदवार जाहीर केलाय.
काय आहे वाराणसीचं समीकरण?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.
2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.