नवी दिल्ली : बेताल वक्तव्यांसाठी समाजवादी पक्षाचे कुप्रसिद्ध खासदार आझम खान (Azam Khan) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेल्या भाजप खासदार रमा देवी (Rama Devi) यांच्यावर वक्तव्य केलं. तुम्ही (Rama Devi) खुप सुंदर दिसता, एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलावं वाटतं, असं वक्तव्य आझम खान (Azam Khan) यांनी केलं. यानंतर भाजपच्या खासदारांनी (BJP MPs) एकच गोंधळ केला.
लोकसभेत ट्रिपल तलाकवर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या वतीने आझम खान यांना संधी देण्यात आली होती. आझम खान यांनी तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, असं म्हणत सावरण्याचाही प्रयत्न केला. पण केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या वक्तव्याचा निषेध करत माफीची मागणी केली.
https://twitter.com/GovindRajvansi/status/1154341966286483457
भाजपच्या खासदारांनीही यानंतर गोंधळ केला. पण विशेष म्हणजे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझम खान यांचं समर्थन केलं. आझम खान यांचा लोकसभा अध्यक्षांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, हे भाजपवालेच उद्धट आहेत, असं प्रत्युत्तर अखिलेश यादव यांनी दिलं.
नेमकं काय घडलं?
आझम खान संसदेत बोलत असताना त्यांनी एका शेरच्या माध्यामातून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. आझम खान सत्ताधाऱ्यांकडे पाहून ‘तु इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला क्यु लुटा’ असं म्हटल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या खासदार रमा देवी यांनीही त्यांना मिश्किलपणे तुम्ही इकडे तिकडे न पाहता माझ्याकडे पाहून बोला असं म्हटलं. त्यानंतर संसदेत एकच हशा पिकला.
यावर उत्तर देताना आझम खान यांची चीभ घसरली. आझम खान म्हणाले, “मला तर तुमच्याकडे इतकं पाहावंसं वाटतं की तुम्ही म्हणाल नजर हटवा. मला तुम्ही इतक्या चांगल्या आणि सुंदर वाटतात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलत रहावंसं वाटतं.” यावर खासदार रमादेवी यांनी देखील हजरजबाबीपणे मी तुमची छोटी बहिण असल्याने तुम्हाला असं वाटत असल्याचे उत्तर दिले. यानंतर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी आझम खान यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या माफीची मागणी केली.
दरम्यान, आझम खान यांनी बेताल वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार जया प्रदा यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.