मुंबईकरांनो व्हा सावध, निवडणूकीतील पैशांच्या गैरवापरावर लागणार अंकुश, प्राप्तीकर विभागाचा विशेष नियंत्रण कक्ष

| Updated on: Mar 21, 2024 | 9:18 PM

लोकसभा निवडणूकांची घोषणा झाली आहे. निवडणूकांमध्ये मतदारांना प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यासाठी प्राप्तीकर विभागाने खास नियंत्रण कक्ष उभारला आहे. लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी नागरिकांनी पैशांच्या किंवा इतर गैरव्यवहाराची माहिती प्राप्तीकर विभागाला सादर करावी, अशी विनंती प्राप्तिकर विभागाने केली आहे.

मुंबईकरांनो व्हा सावध, निवडणूकीतील पैशांच्या गैरवापरावर लागणार अंकुश, प्राप्तीकर विभागाचा विशेष नियंत्रण कक्ष
loksabha election
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूका निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे. या निवडणूकात कोणत्याही आमीष आणि दडपणाशिवाय मतदानाचे कर्तव्य पार पाडता यावे यासाठी आता प्राप्तीतर कर विभाग देखील चांगलाच कामाला लागला आहे. लोकसभा निवडणूकीत मतदारांना प्रलोभन दाखवून त्यांना फशी पाडण्यासाठी पैशांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे प्राप्तीकर विभागाने दिवसाचे 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाला सामान्य नागरिक त्यांना काही वावगे वाटल्यास तक्रार करू शकणार आहेत.

लोकसभा निवडणकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 19 एप्रिल ते 1 जून 2024 दरम्यान देशभरात लोकसभा निवडणूका होणार आहेत. आणि 4 जून रोजी या निवडणूकांचे निकाल लागणार आहेत. भारतीय लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवाला कुठे गालबोट लागू नये. मतदान कोणत्याही प्रलोभनाशिवाय शांततेत आणि दबावाशिवाय पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. शिवाय आता प्राप्तीकर विभागाने देखील यंत्रणा सुसज्ज केली आहे. मतदारांना अनेकदा प्रलोभने दाखविण्यासाठी पैसा, मद्य आणि इतर वस्तू वाटण्याचे प्रकार घडत असतात. अशा प्रकारांना अंकुश लावण्यासाठी प्राप्तीकर विभागाने आपला नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबईतील प्राप्तिकर विभागाने खास यंत्रणा उभारली आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघातील मतदान सुरळीत पार पडण्यासाठी प्राप्तीकर विभाग कटिबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडल्या जाव्यात यासाठी मुंबई प्राप्तीकर विभागाने निवडणुकांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी 24×7 म्हणजेच पूर्णवेळ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत, म्हणजे 20 मे 2024 पर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. सजग नागरिकांनी या कक्षाला पैशांच्या अथवा मौल्यवान वस्तूंच्या गैरव्यवहाराबद्दल माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी माहिती देण्यासाठीचे टोल फ्री क्रमांक, व्हॉट्स ॲप क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आणि ई मेल पुढील प्रमाणे आहेत :

टोल फ्री क्रमांक : 1800-221-510

व्हॉट्स ॲप/भ्रमणध्वनी क्रमांक : 8976176276/ 8976176776

ईमेल आयडी : mumbai.addldit.inv7@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता : खोली क्रमांक. 316, तिसरा मजला, सिंधीया हाऊस, बलार्ड इस्टेट, मुंबई – 400001