अहमदनगर: भूत, पिशाच्च, शकून – अपशकून, जादूटोणा आणि शापित हे शब्द आपण ऐकतो. मात्र शापित या शब्दानं अहमदनगरला भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरवली आहे. अहमदनगर मनपाचं उपमहापौर शापित असल्याच्या चर्चांनी ऐन निवडणुकीत जोर धरला आहे. आतापर्यंत सात जणांनी मनपाचं उपमहापौरपद भूषवलं, मात्र ते मनपातून हद्दपार झाले आहेत. नेमकं काय आहे रहस्य?
उपमहापौरपद शापित असल्याची चर्चा नगरमध्ये आहे. याला कारणही असंच आहे. नगर मनपाचं उपमहापौरपद सात जणांनी भूषवलं. मात्र सातही माजी उपमहापौरांमागे राजकीय साडेसाती लागली. सातही माजी उपमहापौर पालिकेतून हद्दपार झाले आहेत. त्यामुळं उपमहापौरपद शापित असल्याचा ठपका बसला आहे.
अहमदनगर मनपाची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत मोठी चुरस आहे. नगरसेवकांसाठी सर्वांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. काहींचा डोळा महापौरपदावर आहे, मात्र उपमहापौरपद म्हटलं की अनेकजण कानाला हात लावतात. उपमहापौर मनपाच्या सत्ताकारणातील मानाचं पद. मात्र हे पद शापित असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ऐन निवडणुकीत शापित उपमहापौर परवलीचा शब्द झाला आहे.
अहमदनगर मनपाची स्थापना 2003 सालची. आतापर्यंत सात जणांनी उपमहापौरपद भूषवलं. मात्र हे सातही उपमहापौर पालिकेतून बाद झाले आहेत. सातही जणांची माजी शब्दावर बोळवण झाली. उपमहापौर झाल्यावर सातही जणांचा मनपातील पत्ता कट झाला आहे.
शापित उपमहापौर कोण?
1) ज्ञानेश्वर सदाशिव खांडरे
2)दीपक सूळ
3)हाजी नजीर मोहोम्मद शेख
4)गितांजली सुनिल काळे
5)सुवर्णा संदिप कोतकर
6)श्रीपाद छिंदम
7)अनिल वसंत बोरुडे
अहमदनगर मनपाच्या सात जणांना शापित उपमहापौर पदाचा शिक्का बसलाय. यात भाजपाच्या तीन, राष्ट्रवादीचा एक, काँग्रेसचे दोन आणि एका शिवसैनिकाचा समावेश आहे. उपमहापौरपद भूषवल्यानंतर सातही जणांच्या मागं राजकीय साडेसाती लागली आहे. सातही जणांच्या नशिबी राजकीय वनवास आला आहे. काहींनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र पदरी निराशाच पडली.
सात उपमहापौरांपैकी छिंदम आणि सुवर्णा कोतकरचे सर्वाधिक ग्रह फिरलेत. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा छिंदम हद्दपार झाला आहे, तर शिवसैनिकांच्या हत्याकांडात सुवर्णा कोतकरवर कारवाईची टांगती तलवार आहे. छिंदम पत्नीसह यंदा पुन्हा नशीब आजमावतोय, तर कोतकर फरार आहे.
शापित उपमहापौराला पुष्टी देणार्या अनेक घटना आहेत. अनिल बोरुडे हे कट्टर शिवसैनिक. गेल्या पंधरा वर्षांपासून ते सेनेचे नगरसेवक होते. छिंदमची उपमहापौरपदावरुन गच्छंती झाल्यावर त्यांनी उपमहापौरपद भूषवलं, मात्र यंदा प्रभागरचनेत त्यांच्या वार्डाची मोडतोड झाली. सुरक्षित मतदारसंघ नसल्यानं त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि दुसर्या प्रभागात पत्नीला उमेदवारी दिली.
सत्ताकारणात खुर्ची महत्वाचे आसते. भले ती महापौरपदाची असो नाहीतर उपमहापौर पदाची. उपमहापौरपद हे तर मनपा सत्ताकारणातील मानाचं पद आहे. मात्र शापितचा ठपका बसल्यानं अनेकजण उपमहापौरपदाच्या खुर्चीपासून दूर पळत आहेत. त्यामुळं काहींचा डोळा जरी महापौरपदावर असला तरी नगरकरांचं लक्ष मात्र उपमहापौरपदाकडं लागलंय.