पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे 3 दिवस मराठवाडा दौऱ्यावर होते. मात्र त्यांच्या दौऱ्यावर बरीच टीका झाली. या टीकेचं कारण काय, राज्यपालांचा दौरा नेमका कशासाठी होता आणि त्यातून काय मिळालं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा खास आढावा.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीमधली कुरबुर तशी नवी नाही. मात्र, त्यात आणखी भर पडली ती म्हणजे मराठवाड्यातील दौऱ्याची. भाजप ज्या राज्यात सत्ता नाही तिथं राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा कार्यक्रम राबवतेय असा आरोप संजय राऊतांनी केला. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करूनही राज्यपाल दौऱ्यावर गेले. पहिला दौरा नांदेड जिल्ह्याचा केला.
नांदेडमध्ये येताच त्यांनी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाला भेट दिली. राज्यपाल जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी निघून गेले. पहिल्या दिवशी त्यांनी जिल्ह्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. मात्र, दौऱ्यावरून टीका होताचं राज्यपालांनी महाविकास आघाडीलाही त्याच शब्दात उत्तर दिलं. मी घटनाबाह्य दौरा करत नसल्याचं सांगत मी घटनेच्या नियमाप्रमाणे काम करतोय असं सांगत महाविकास आघाडीला टोला लगावला.
राज्यपालांचा दूसरा दिवस हिंगोली जिल्ह्यात होता. हिंगोली जिल्ह्यात इतरत्र न जाता फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून संत नामदेव महाराजांच्या नसरी गावात ते दर्शनासाठी गेले. मात्र, राज्यपाल दौरा करत असल्यानं महाविकास आघाडीला मात्र काही रुचलं नाही. त्याला प्रत्यूत्तर देताना राज्यपाल म्हणाले,”घटनेनं मला जे अधिकार दिलेत त्यानुसार मी पाहणी करतोय. चर्चा करतोय कृषी आणि सिंचन विभागाची माहिती घेतोय.”
राज्यपालांच्या दौऱ्यावर राजकीय दौरा असल्याचा आरोप होत टीका झाली. मात्र, राज्यपालांनी राजकीय दौऱ्याचं रुप न येऊ देता दौरा केला. राज्यपाल हे राज्यातील सगळ्या विद्यापीठाचे पदसिद्ध कूलपती असतात. म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र, राज्यपालांच्या दौऱ्यातून नेमकं काय मिळालं? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
Special report on Marathwada tour of Governor Bhagat Singh Koshyari