यवतमाळ : शिवसेना-भाजप युतीच्या संभावित उमेदवार खासदार भावना गवळी यांच्याविरोधात अध्यात्मिक गुरु प्रेमासाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाणारे प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. उमेदवारी अर्ज दाखल करत त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात एंट्री केली आहे.
प्रेमासाई महाराज हे गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केले होतं. सुरुवातीला भाजपकडून माझी उमेदवारी नक्की आहे असं सांगून त्यानी राजकीय खळबळ उडवली होती. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना यवतमाळमध्ये आणून भाजप नेत्यांशी असलेली जवळीक त्यांनी दाखवून दिली होती. मात्र भाजप-शिवसेनेची युती झाल्याने त्यांचा हिरमोड झाला.
प्रेमासाई यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल करत विद्यमान खासदार भावना गवळी यांना आव्हान दिलंय. गेल्या 20 वर्षात कुठलाही विकास झाला नाही, जनतेची कामे करण्यासाठी मी उमेदवारी दाखल केली असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रेमासाई महाराज यांची आधीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असल्याचं म्हटलं जातं. याबाबत त्यांना विचारणा केली असता माझ्यावर एकही गुन्हा सिद्ध झाला नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
भावना गवळींच्या जमेच्या बाजू काय?
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात लढतीचे चित्र आहे. असे असले तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काहींचे समीकरण बदलणार यात शंका नाही. अनेक वर्षे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत शिवसेनेचा गड केला आहे. आगामी निवडणुकीतही काँग्रेस-शिवसेना असाच सामना रंगणार आहे. काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.
वाशिम विधानसभा राजकीय गटतट आणि सामाजिक समीकरणे
विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अडीच लाखाच्या जवळपास मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 22 टक्के मराठा, 11 टक्के मुस्लीम, 13 टक्के दलित, 7 टक्के माळी, 4 टक्के धनगर आणि इतर मतदारांचे तीन टक्के प्रमाण आहे. या मतदारसंघात सतत तीन वेळा शिवसेनेने विजय मिळवलाय. हिंदू दलित आणि बौद्ध असे मतांचे ध्रुवीकरण होत असल्याने काँग्रेसने आतापर्यंत बौद्ध समाजाचाच उमेदवार दिला. त्यामुळे शिवसेनेचा विजय सुकर झाला. यावेळी मात्र भारिपने या मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली असून काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम आणि दलित मतांवर भारिपचा प्रभाव असल्याने यावेळी ही निवडणूक भारिप विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून इथे प्रो. प्रवीण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.