सांगली : या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेतलंय. राजू शेट्टींसाठी राष्ट्रवादीकडून हातकणंगले, तर काँग्रेसकडून सांगली मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता आहे. पण यापूर्वीच सांगलीत काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, पाटील आणि कदम घराण्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्याच्या शक्यतेच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. काँग्रेसची जागा अन्य पक्षांना देण्यामागे षडयंत्र असून या मागे, कोण झारीतील शुक्राचार्य आहे, याचा शोध घेऊ, अशी टीका काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली. तर विशाल पाटील यांनी स्टंटबाजी केली असून ज्या पाटील घराण्याकडे अनेक वर्षे, खासदारकी होती ते आता उमेदवारीपासून पळवाट का काढत आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केला.
सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी संघटनेला देण्याच्या शक्यतेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला कुलूप घातलं. कुलूप घालायचं का नाही यात पण काँग्रेसमध्ये गटबाजी पुढे आली. कार्यकर्त्यांच्या गटबाजीनंतर काँग्रेस नेते विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
विश्वजित कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. तर विशाल पाटील हे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. सांगलीमध्ये कदम आणि पाटील घराण्यामधील वाद यापूर्वीही समोर आला आहे.