मुंबई : मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज आक्रमक स्वरुप मिळालं. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक दिली. पवारांच्या निवासस्थानासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. अचानकपणे झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पवार यांच्या निवासस्थानासमोरच हे आंदोलन झाल्यानं राज्यभर याची जोरदार चर्चा सुरु झालीय. एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर बाटल्या आणि चपलाही फेकल्या गेल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) स्वत: सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत.
शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचारी पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांनी ब्रीड कॅन्डी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार सिल्व्हर ओकवर उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातून बाहेर पडत एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांततेचं आवाहन केलं. मात्र, एसटी कर्मचारी आक्रमक होते. सुप्रिया सुळे यांनाही घेरण्याचा यावेळी प्रयत्न झाला. शेवटी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना एका शाळेच्या बसमधून जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
गुरुवारी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. त्यामुळे आज असं काही आंदोलन होईल याची कल्पना पोलिसांना किंवा अन्य कुणालाच नव्हती. मात्र, दुपारी अचानकपणे एसटी कर्मचारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. अचानकपणे सुरु झालेल्या या आंदोलनामुळे पोलीसही काही काळ चक्रावून गेले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. आता आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची माहिती पोलिसांना कशी लागली नाही? मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली का? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचारी धडकले. त्यांनी पवारांच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली, चप्पल आणि बाटल्या फेकल्या. त्या नंतर मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
इतर बातम्या :