मुंबई : मागील तीन ते चार महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) आज आक्रमक पवित्रा घेतला. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक दिली. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर बाटल्या आणि चपलाही फेकल्या. आंदोलकांना शांत करण्यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) रस्त्यावर उतरल्या. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं. मात्र, एसटी कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नजिकच्या पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान, आंदोलकांनी माझ्याशी येऊन बोलावं. त्यांनी अशाप्रकारे माझ्या घरावर हल्ला करण्याची गरज नव्हती. मी मुंबई पोलिसांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच घडतंय. माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे. चर्चेला बसायची माझी तयारी आहे. आपण चर्चेला बसू शकतो. आपण याआधीही बसलेलो आहोत. जे काही करायचं, ते शांततेनं करुयात. काल जे जल्लोष करत होते, ते आज अचानक आंदोलनावर का उतरले? माझ्या घरावर आज मोठा हल्ला झाला आहे. हा दुर्दैवी आहे. आम्हाला या सगळ्यातून सुरक्षित ठेवल्यावरुन मी एवढंच बोलू शकते, ही मुंबई पोलिसांचे मी आभार मानते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचारी पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यांनी ब्रीड कॅन्डी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शरद पवार सिल्व्हर ओकवर उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातून बाहेर पडत एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शांततेचं आवाहन केलं. मात्र, एसटी कर्मचारी आक्रमक होते. सुप्रिया सुळे यांनाही घेरण्याचा यावेळी प्रयत्न झाला. शेवटी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना एका शाळेच्या बसमधून जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
गुरुवारी उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. त्यामुळे आज असं काही आंदोलन होईल याची कल्पना पोलिसांना किंवा अन्य कुणालाच नव्हती. मात्र, दुपारी अचानकपणे एसटी कर्मचारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. अचानकपणे सुरु झालेल्या या आंदोलनामुळे पोलीसही काही काळ चक्रावून गेले होते. या संपूर्ण प्रकारानंतर मुंबई पोलीस सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. आता आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या :