‘बऱ्याच कामगारांना कामावर येण्याची इच्छा, त्यांना संरक्षण पुरवणार’, अनिल परबांचा दावा

| Updated on: Nov 11, 2021 | 4:46 PM

एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते यांना अडवत असल्याचा आरोप परब यांनी केलाय.

बऱ्याच कामगारांना कामावर येण्याची इच्छा, त्यांना संरक्षण पुरवणार, अनिल परबांचा दावा
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबतच रात्र काढली. एसटीच्या विलिनीकरणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. मात्र, भाजपचे कार्यकर्ते यांना अडवत असल्याचा आरोप परब यांनी केलाय. (Anil Parab alleges that BJP is obstructing ST workers who want to return to work)

अनिल परबांचा भाजप नेत्यांवर आरोप

बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे. त्यांना संरक्षण देण्याचा निर्णयही आम्ही घेतलाय. इतर कामगारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करु नये. याबाबत पोलिस आणि एसटीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच भाजप कार्यकर्ते एसटी कर्मचाऱ्यांना अडवण्याचं काम करत आहेत. कामगारांनो तोल जाऊ देऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आंदोलनात वेळ वाया घालवू नका. जो अहवाल येईल त्याचं बंधन आम्हा दोघांवरही असेल. राजकीय आंदोलन करुन एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

तुमच्या काळात एसटीचं विलिनीकरण का केलं नाही?

आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल परब यांनी केला. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. एसटी व्यवस्थित धावत होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हानच त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं.

चर्चेची दारं खुली आहेत

कालही आम्ही चर्चेची दारं खुली ठेवली होती. आजही चर्चेला तयार आहोत. काल सदाभाऊ खोत यांना मी सर्व परिस्थिती सांगितली. पण त्यांनी बाहेर जाऊन वेगळंच काही तरी सांगितलं. आजही त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो. उद्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करूया म्हणाले. माझी आजही चर्चेची तयारी आहे. विरोधी पक्षनेत्यांसोबतही चर्चेची तयारी आहे. माझी चर्चेची दारं खुली आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे मला माहीत नाही. पण हा प्रश्न जेवढा चिघळेल तेवढं एसटीचं नुकसान होईल. तुमचंही नुकसान होईल. अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या एसटीचं आणखी नुकसान होऊ देऊ नका. आपण त्यातून मार्ग काढूया, असं आवाहन त्यांनी केलं.

इतर बातम्या :

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु, विजय वडेट्टीवारांचं आश्वासन

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

Anil Parab alleges that BJP is obstructing ST workers who want to return to work