मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसची कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. तर आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसह ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब, पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत सरकारकडून पहिल्यांदा एक पाऊल पुढे येत अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय. तर सरकारच्या या प्रस्तावाबाबत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं पडळकर आणि खोत यांनी सांगितलं. (Gopichand Padalkar and Sadabhau Khot will decide on the proposal of interim pay hike after discussing with ST Workers)
अनिल परब यांच्यासोबत आज चर्चा झाली. आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत. परब यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. समितीचा अहवाल आम्हाला मान्य असेल. मात्र तोवर अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव तुम्हाला मान्य होईल का? असा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांनी दिल्याची माहिती पडळकर यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे त्यांचा पगार हा इतर कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढा नाही आणि दुसरा म्हणजे पगाराची शाश्वती नाही. महिन्याच्या सात तारखेला यांचा पगार व्हायचा तर कधी महिना, कधी दोन महिने तो पुढे जातो. तर हे विषय सरकारच्या लक्षात आलेले आहेत. तर त्याबाबत तुमचा काही प्रस्ताव असेल तर तो द्यावा, आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत, असं परब यांनी सांगितल्याचं पडळकर म्हणाले.
आंदोलन सुरु झालं तसं आज पहिल्यांदा राज्य सरकारकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव असा आहे की विलिनीकरण होत नाही तोवर तुमची काय मागणी आहे. तुमचा काही प्रस्ताव आहे का? अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव तुम्हाला चालेल का? अशी विचारणा परबांनी केल्याचंही पडळकरांनी सांगितलं. त्यावर आज रात्री आणि उद्या सकाळी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करु. त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही आमचा निर्णय राज्य सरकारला कळवू, असं पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, विलिनीकरणाबाबत कोर्टानं नेमलेल्या समितीचा अहवाल जर नकारात्मक आला तर तुम्ही काय कराल? असा प्रश्नही एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री महोदयांना विचारला. त्यावर बोलताना विलिनीकरण झालं नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला काही देता येईल का याचा विचार करु, असं आश्वासन परब यांनी दिल्याचंही पडळकर म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारकडून संप मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करण्यात आला. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या. अनेकांचं निलंबन करण्यात आलं. तर निलंबन झालेले जवळपास 100 टक्के कर्मचारी उद्या आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. उद्या त्यांच्याशी चर्चा करु. त्यांचं म्हणणं जाऊन घेऊ, उद्यापर्यंत आम्ही सरकारच्या भूमिकेबाबत कामगारांशी चर्चा करुन, मग पुढील भूमिका ठरवू, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलीय.
आम्ही पैशाची ऑफर दिली नाही. संघटनेला दोन- तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. वाढ दिल्यानंतर समितीने एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल, असं अनिल परब यांनी सांगितलं. कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग काढू अस सांगतानाच कामगारांनी संप मागे घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच या संपात कोणतंही राजकारण केलं जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :
Gopichand Padalkar and Sadabhau Khot will decide on the proposal of interim pay hike after discussing with ST Workers