मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया कॅम्पेन सांभाळणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता शिवसेनेसाठी नियोजन करणार आहेत. प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर जाऊन पॉवर पॉईंट प्रझेंटेशन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे प्रशांत किशोर आता शिवसेनेचं डिजीटल कॅम्पेन पाहणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय.
शिवसेनेने भाजपचा मास्टरमाईंड शिवसेनेत खेचून आणला असं चित्र निर्माण करण्यात येत आहे. पण मुळात प्रशांत किशोर हे संपूर्ण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं डिजीटल कॅम्पेन सांभाळणार आहेत. प्रशांत किशोर यांची काही काळापूर्वी जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती होणार असून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याची परिणीती म्हणून भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच प्रशांत किशोर यांना शिवसेनेकडे पाठवलं आहे का हाच प्रश्न आहे.
प्रशांत किशोर यांच्या एंट्रीने भाजप-शिवसेना यांची युती निश्चित झाल्याचं बोललं जातंय. शिवसेना आणि भाजप यांच्यात जागांचा फॉर्म्युला तयार असल्याचं भाजपच्या नेत्यांकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. 23-25 चा फॉर्म्युला होणार असल्याचं बोललं जातंय. पण अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत या सर्व चर्चाच आहेत, असं म्हणावं लागेल.
प्रशांत किशोर कोण आहेत?
42 वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी आहेत.
प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’चे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम पाहत होते.
नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.
त्यांनी भारतातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना केली.
या कंपनीच्या माध्यमातून प्रशांत यांनी दिग्गजांच्या प्रचाराची कंत्राटं घेतली आणि त्यांना निवडून आणलं.
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती.
‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रशांत किशोर यांच्या टीमचीच घोषणा होती
2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची साथ सोडली.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या प्रचाराची धुरा सांभाळली
बिहारमध्ये जेडीयूला भरघोस यश मिळून, नितीश कुमार सत्तेत आले.
प्रशांत किशोर हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत.
निवडणूक न लढवूनही त्यांना बिहारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.
बिहार निवडणुकीत जेडीयूची रणनीती प्रशांत किशोर यांनीच आखली होती. त्यामुळे जेडीयूला मोठं यश मिळालं.
त्यापूर्वी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या बलाढ्य विजयाची रणनीती प्रशांत किशोर यांनीच ठरवली होती.
‘चाय पे चर्चा’, 3D सभा, ऑनलाईन दरबार, वॉर रुम, सोशल मीडिया, व्हिक्टरी रुम, घर घर दस्तक, रिंगटोन आणि रेकॉर्डेड मेसेज, अशा नवनव्या प्रचार कल्पना प्रशांत किशोर यांनी राबवल्या होत्या.
गुजरातमध्ये 3D प्रचार लोकसभेपूर्वी मोदींच्या 3D सभेचं आयोजन गुजरात निवडणुकीत करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रशांत यांनीच ही योजना आखली होती. त्याचवेळी मोदींची प्रतिमा बदलून हायटेक आणि टेक्नोसेव्ही मुख्यमंत्री अशी झाली होती.