मुंबई : सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी आणि राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी (Sudhir Mungantiwar on Narayan Rane claim) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar on Narayan Rane claim) सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. नारायण राणे यांचं सरकार स्थापनेविषयीचं मत त्यांचं व्यक्तिगत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. आज राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे. अनेक समस्या आहेत. असं असताना जनादेशाच्या अनादर करण्यात आला. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली.”
काही पक्षांनी जनादेशाचा अनादर केला आहे. राज्यात शोषितांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. अशास्थितीत राज्यात राष्ट्रपती शासन लागलं. 24 नोव्हेंबरला निकाल स्पष्ट होता. सरकार लवकर स्थापन व्हावं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा ही अपेक्षा होती. मात्र, भाजपला सर्वात मोठा पक्ष असताना, जनादेश असतानाही तसं करता आलं नाही. आम्ही इतर पर्याय शोधले नाही. आमच्या मित्रपक्षाने मात्र इतर पर्याय शोधले, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीचं खापर शिवसेनेवर फोडलं.
सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या बहुमत असल्याच्या दाव्यावरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “आजपर्यंत कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. कुणीही कोणत्याही गटाच्या समर्थनाचं पत्र सादर केलं नाही. इतरांचा पाठिंबा असल्याचं सांगणाऱ्यांना असा पाठिंबा राज्यपालांना दाखवता आला नाही. आम्ही राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यांनी आम्हालाही वेळ वाढवून दिला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिका अप्रस्तुत आहे.”
नारायण राणे काय म्हणाले?
नारायण राणे म्हणाले होते, “मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करु असं सांगितलं. आता आम्ही (भाजप) सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईन. भाजपची सत्ता येण्यासाठी जे करावं लागेल, ते करेल. मी जास्त माहिती देणार नाही, नाहीतर येणारेही यायचे बंद होतील. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजप सरकार स्थापन करणार असून कामाला लागा, असं सांगितलं आहे.”
विशेष म्हणजे नारायण राणे यांनी भाजप सरकार स्थापन करणार असल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं म्हटलं. तसंच अधिक माहिती देणार नाही, अन्यथा येणारेही येणार नाही, असं म्हणत त्यांनी इतर पक्षाचे आमदार भाजपमध्ये आणण्याचं सूचक विधान केलं. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीचं राजकारण करत असल्याची शंकाही उपस्थित केली गेली. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी नाराणय राणेंच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच ती नारायण राणेंची व्यक्तिगत भूमिका असल्याचं म्हटलं.