गोंदिया : आजच्या सामनाच्या अग्रलेखात शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रवादीचा राजीनामा आणि त्यानंतर घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. त्यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामना हे वृत्तपत्र नाही शिवसेनेचं पॅम्प्लेट आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. शरद पवार यांनीही या अग्रलेखावर प्रतिक्रिया दिली आहे.
सामना हे वृत्तपत्र नसून पॅम्प्लेट आहे. त्यात ते काय लिहतात. त्याचं उत्तर आम्ही कशाला द्यायचं .ते वर्तमानपत्र कुठं आहे? सामनाच्या माध्यमातून शिवसेना आपल्या पक्षाचे विचार ते ठेवत असतात. त्यात जनतेचा विचार कुठे केला जातो, असा घणाघात सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यावर यावर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवार म्हणालेत.
ज्याप्रमाणे शिवसेना सोडली त्याप्रमाणे राष्ट्रवादी सुद्धा फोडण्याचा डाव भाजपचा आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डाव आहे तर होऊ द्या जर तुमच्या पक्षाचे विचार एवढे कच्चे आहेत का? तुमच्या संघटना एवढ्या कमजोर आहेत का? तुमचे नेते सुद्धा एवढे कमजोर आहेत का? जर आपल्या पक्षाच्या आमदारांना खासदारांना आणि कार्यकर्त्यांना सांभाळता येत नसेल तर त्या पक्षाने राजकारण सोडून द्यावं . जे पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना सांभाळून ठेवू शकत नाही, त्यांनी राजकारण करू नये, असा निशाणा सुधीर मुनगंटीवार यांनी साधला आहे.
देशाच्या पंतप्रधानपदी ओबीसी नेत्या बसला असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. या पोटदुखीचं कोणतंही औषध नाही. या देशाला एक सक्षम नेतृत्व वाढलेला आहे . देशाचे सन्मान वाढवतो. देशात जातीचे पक्ष आहेत. जातीच्या नावावर मतदान मागतात.देशाचे पंतप्रधान, मंत्र्यांनी देशाची उंची वाढविली आहे. अश्या नेत्यांच्या बाबत स्वार्थी, खुर्चीवर प्रेम करणारे लोक असंच बोलणार, असं म्हणत मुनगंटीवार यांनी ओवैसींना टोला लगावला आहे. भाजप हा जातीवादी पक्ष आहे याला देशातून हद्दपार करणे गरजेचं आहे, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.