मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि मोहित कंबोज यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. माझ्या मुलीच्या लग्नात ज्यांना ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांच्याकडे अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी केली. फुलवाला, केटरिंगवाला, डेकोरेशनवाला आणि आता तर मेहंदीवाल्याकडे चौकशी केल्याचं मला समजलं. त्यांच्या सरकारच्या काळातही तत्कालीन वन मंत्र्यांच्या घरातील लग्नात फॉरेस्ट उभारण्यात आलं होतं. साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकण्यात आलं होत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. राऊतांच्या या आरोपाला आता स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘खोदा पहाड आणि निकला चुहे का छोsssssटासा फोटो.. डॉक्टरपेक्षा कमपाऊंटर मोठा… हरामखोर पेक्षा नॉटी मोठा, असा राऊतांचा रिसर्च आहे. त्यांनी या अगोदरच त्या कार्पेटची चौकशी केलेली आहे. त्याचा अहवाल सरकारकडे आहे. असा कुणी कार्पेट टाकतं, आपल्यावर आरोप झाले, म्हणून खोटं रेटून बोलणं हे काही योग्य नाही. आम्ही अशा पत्रकार परिषद घेऊन आरोपाला आरोप कधी केलेले नाही, असा टोला मुनगंटीवार यांनी राऊतांना लगावलाय. तसंच माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 9 लक्ष रुपये सांगितले. आकडा तेवढा तुम्ही दुरुस्त करुन घ्या, असंही मुनगंटीवार म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री असताना 25 हजार कोटीचा घोटाळा झाला, असं ते म्हणाले. तेव्हा तर सेनेचेही मंत्री कॅबिनेटमध्ये होते, त्यांचाही अवमान केलाय राऊतांनी आज. एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, हे जागृक होते, ते असं होऊ देतील असं मला वाटत नाही. राज्याचं दु्र्दैवं आहे, की कमीत कमी एखादा व्यक्ती एखाद्या पुराव्याखाली आरोप करतो, ते ठीक आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी कोर्टात द्यावी, तपासयंत्रणांकडे द्यावी, मदत होईल चौकशीला, असा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय. तसंच राऊतांनी केलेली मागणी असेलच. पण तुमच्यावर आरोप केले, तुम्हाला जेलमध्ये टाकलं गेल, म्हणून तुम्ही दुसऱ्यावर जेलमध्ये टाकण्याचं म्हणत असला, तर ते चूक आहे. बिल्डरांनी आरोप केलाय का, त्यांनी पैसे दिले, असं सांगितलं तरच त्यात काहीतरी तथ्य आहे. ही तर राजकीय हास्यजत्रा होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.
‘मुंबईत एक लग्न झालं होतं. त्यावेळी साडे नऊ कोटीचं कार्पेट टाकलं होतं. आम्ही गप्प होतो. हे लग्न भाजपच्या नेत्याचं होतं. ते वनमंत्री होते. आम्ही गप्प् राहिलो लग्नावर काही बोलायला नको आणि तुम्ही आमच्यावर राग-राग करता, आता बघूनच घ्या. जेलमध्ये टाकणार आहात, टाका. मी जायला तयार आहे’, असं संजय राऊत म्हणाले होते.
इतर बातम्या :