मुंबई : ‘देवेंद्र फडणवीस हे अतिशय मोठ्या पदावरती आहेत. ते एकनाथ खडसे यांच्या विरोधात काम करणार नाहीत’, असं माजी वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) ‘टीव्ही९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पक्षावर नाराज आहेत. गेल्या महिन्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात त्यांची ही नाराजी दिसून आली होती.
याशिवाय बुधवारी एकनाथ खडसे यांनी दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे आपलं विधानसभेचं तिकीट कापलं गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र खडसेंचा हा आरोप मुनगंटीवार यांनी फेटाळला.
नेमकं काय म्हणाले मुनगंटीवार?
‘देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्या विरोधात काम केलं, असं एकनाथ खडसे म्हणाले नाहीत. त्यांची भावना मी आज टीव्हीवर बघितली. तिकीट देताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपलं काही मत मांडलं, एवढंच ते म्हणाले. देवेंद्रजी अतिशय मोठ्या पदावरती आहेत. ते असं काही काम करणार नाहीत. गिरीश महाजनही मंत्री होते. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात काम करणं हे अशक्य आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं आहे आणि त्याचे पुरावे खडसे यांनी दिले आहेत. त्या पदाधिकाऱ्यांनी खुलेआम खडसे आणि पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचे आव्हान दिलं होतं. त्यामुळे खडसेंचे पुरावे खरे निघाले तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
‘खडसेंनी आयुष्याचे ४० वर्षे पक्षाला दिले’
‘एकनाथ खडसे यांची नाराजी दूर झाली पाहिजे. शेवटी पक्षाच्या विस्तारासाठी आणि वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता महत्त्वाचा आहे. एकनाथ खडसे यांनी आयुष्याचे ४० वर्षे पक्षाला दिले आहेत. आपल्या परिवाराचा हक्काचा क्षण त्यांनी पक्षासाठी दिला. त्यामुळे ते नाराज असू नये, असं पक्षातील सर्वांना वाटतं. आता संवाद, चर्चेतून खडसे यांची नाराजी दूर करण्याचा पक्ष म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. शेवटी सत्ता येते आणि जाते. सत्ता असतानाही किंवा नसताना कार्यकर्ता आणि नेता यांनी जमिनीला पाय लावून पक्षाच्या विचाराच्या विजयासाठी काम केलं पाहिजे. यासाठी खडसेंचं नाराज असणं, हे पक्षासाठी आनंदाचं असू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असं मुनगंटीवार म्हणाले.
‘एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत आजही मी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो. या सर्व विषयावर चर्चा करु. शेवटी हा प्रश्न संपला पाहिजे. त्यांनी जर पुरावे दिले आहेत की त्यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं. तर पुरावे तपासले जातील आणि ते पुरावे खरे निघाले तर पक्षविरोधात कारवाई करणाऱ्यांना पक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही’, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.