मुंबई : भाजपचे राज्यातील मोठे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशावेळी मुनगंटीवार यांनी या भेटीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना-भाजप शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत. भाजप आणि शेवसेनेचं काय होतं पुढे बघू. हिंदुत्वाचा आणि जनतेचा आवाज कधी ना कधी दोन्ही पक्षाला ऐकावा लागेल, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं आहे. आता मुनगंटीवारांचं हे वक्तव्य म्हणजे राज्यातील आगामी राजकीय बदलांचं भाकीत तर नाही ना, असंही बोललं जाऊ लागलं आहे. (Sudhir Mungantiwar’s explanation about the role of Devendra Fadnavis )
सह्याद्री अतिथीगृहात झालेली मुनगंटीवार आणि मुख्यमंत्र्यांची भेटीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय? असा प्रश्नही विचारला जात होता. त्यावर जी माझी भूमिका तीच फडणवीसांची असणार, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेचं काँग्रेसशी वैचारिक शत्रूत्व आहे. पण भाजप आणि शिवसेना शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू नाहीत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
एकीकडे मेट्रो प्रकल्प, शेतकरी आंदोलन, वाढीव वीज बिल अशा अनेक मुद्द्यांवरुन भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. तिथे मुनगंटीवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानं अनेकांना प्रश्न पडला आहे. भाजप-शिवसेनेचे अनेक नेतेही या भेटीबाबत आश्चर्य व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. तर राजकीय विश्लेषकही या भेटीचं कारण आणि अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक तर मुनगंटीवार स्वत:साठी फिल्डिंग लावत आहेत का? असाही प्रश्न विचारत आहेत.
राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो. त्या-त्या राजकीय परिस्थितीनुसार नेतेमंडळी एकमेकांवर टीका किंवा एकमेकांचं कौतुक करत असतात. राजकारणापलिकडे जाऊन काही नेत्यांची चांगली मैत्री असल्याची अनेक उदाहरणं आहेत. दुसरी गोष्टी अशी की मुनगंटीवार यांनी हेच म्हटलं आहे की, राजकारणामध्ये आमचं शिवसेनेशी टोकाचं वैर नाही. त्यामुळे कुठेतरी काही नेत्यांनी संवाद करत राहायचं, काही नेत्यांनी प्रहार करत राहायचं, हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो. पण सध्यातरी शिवसेनेनं सध्यातरी काँग्रेस, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करुन ती चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आताच राजकारणात काही बदल घडेल, असं आपल्याला वाटत नसल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :
मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?
Sudhir Mungantiwar’s explanation about the role of Devendra Fadnavis