नाशिक: शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त करतानाच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलं आहे. मला पक्षातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अमान्य आहेत. चुकीच्या पद्धतीने या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे पक्षातील इन्कमिंग थांबली आहे. पक्षाला कुठे तरी ब्रेक लागला आहे, अशी जाहीर नाराजी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली असून शिंदे गटात काहीच अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
शिंदे गटाने महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या सर्वच निवडी चुकीच्या आहेत. हे मी जाहीरपणे सांगतो. इतर पक्षातील नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. जिल्हाप्रमुख संपर्क प्रमुख आणि पदाधिकारी शिंदे गटात यायला तयार आहेत. फक्त नव्या निवडीमुळे ते येत नाहीत. ज्या निवडी झाल्या आहेत, त्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाही असं ते सांगत आहेत, असं सुहास कांदे म्हणाले.
नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नेमलेले पदाधिकारी मला मान्य नाहीत. पक्षात येणाऱ्यांची संख्या थांबली आहे. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि पक्षांच्या सचिवांकडे या संदर्भात मी तक्रार केली आहे. पदाधिकारी चुकीचे नेमले आहे. त्यामुळे पक्ष थांबला आहे, असं त्यांना सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जे पदाधिकारी कामच करत नाही. ज्या पदाधिकाऱ्यांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे, अशाशी मी चर्चाच करत नाही. नेमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर मी नाराज आहे. त्यांच्या नियुक्तीवर माझा प्रचंड आक्षेप आहे. ते त्या पदाला शोभणारे नाहीत, असं ते म्हणाले.
पदाधिकारी नेमल्यानंतर पक्षातील इनकमिंग थांबले आहे. छोटे लोक पक्षात येऊन फायदा नाही. मोठी माणसं पक्षात आले पाहिजे. माजी आमदार, माजी नगरसेवक पक्षात येत नाही. ज्यांच्या पाठी काही हजार मतदार आहेत, असे लोक पक्षात यायला हवेत. पण ते येताना दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं.
कोण जिल्हाप्रमुख आहे मला माहीत नाही. मी कन्फ्यूज आहे. काय होईल मला माहीत नाही. देवालाच माहीत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच नवीन माणसांची यादी दे त्यांच्या नियुक्तीवर चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला.