पुणे: मागील बऱ्याच काळापासून वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकरांचे (Prakash Ambedkar) सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, स्वतः सुजात आंबेडकरांनीच याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. वयोमर्यादेच्या अटीमुळे आपण विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवत नसल्याचं सुजात आंबेडकरांनी सांगितलं आहे.
‘मोदी आणि स्मृती इराणींसारखी खोटी प्रमाणपत्र देण्याची आमची संस्कृती नाही’
सुजात आंबेडकर म्हणाले, “या विधानसभा निवडणुकीत मी कोठूनही उभं राहणार नाही. निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत. त्यानुसार निवडणूक लढवण्यासाठी 25 वर्षे पूर्ण असावी लागतात. माझं वय त्यात बसत नाही आणि मोदी, स्मृती इराणींसारखं खोटं प्रमाणपत्र देण्याची आमची संस्कृती नाही.”
‘वंचित बहुजन आघाडी राज्यातील तरुणांना संधी देणार’
वंचित बहुजन आघाडी राज्यातील तरुणांसाठी एक मंच आहे. यापूर्वी तरुणांचा फक्त स्वतःच्या राजकारणासाठी वापर झाला. आम्ही युवकांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणार आहोत. पाणी, बेरोजगारी आणि युवकांच्या प्रश्नांसह आम्ही मैदानात उतरणार आहे, असंही सुजात आंबेडकरांनी नमूद केलं.
सुजात आंबेडकर म्हणाले, “तरुण की वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. याआधी तरुण इतर पक्षांचे झेंडे उचलत होते, सतरंज्या उचलत होते आणि नेत्यांच्या गाडीमागे फिरत होते. तरूण उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे क्षमता आहे. मात्र, त्यांना सध्या नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुणांचा कल वंचितकडे आहे. आम्ही युवकांना प्रतिनिधित्व देणार आहोत.
‘सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणार’
सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रचार करणार आहोत. मात्र, आम्ही कोणावर टीका-टिप्पणी करणार नाही. वंचितांचा आवाज आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत आम्ही शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न घेऊन निवडणूक लढवणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. एकीकडे पूर परिस्थिती तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. बेरोजगारी शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडू, असंही सुजात आंबेडकरांनी सांगितलं.