अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. अहमदनगरच्या राजकारणात या निमित्ताने मोठी घडामोड होणार आहे. डॉ. सुजय विखे हे उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणार यात काही शंका नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गांधी समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं, मात्र आता वेळ निघून गेल्याने कोणताही उपयोग नाही.
भाजप प्रवेशाअगोदर 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यात सुजय विखे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ठीक 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सुजय विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तसेच नगरच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विखेंकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं जाण्याचीही शक्यता आहे.
पवार विरुद्ध विखे वाद
विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत आम्ही बाळासाहेब विखेंना पाडले होतं, असं वक्तव्य करून मागील वादाची आठवण करून दिली. 1991 साली बाळासाहेब विखेंविरुद्ध यशवंतराव गडाख अशी लढत झाली. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील अपक्ष उमेदवार होते, तर गडाख काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले. यावेळी प्रचारादरम्यान गडाख आणि पवारांनी विखेंवर सडकून टीका केली होती. या निवडणुकीत विखेंना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणुकीनंतर या निकालाला विखेंनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं, तर गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याने लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 123 (4) नुसार त्यांची निवड अवैध ठरवावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली. यावेळी कोर्टाचा निकाल विखेंच्या बाजूने लागला आणि विखेंना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र तेव्हापासून विखे आणि पवार संघर्ष सुरू झाला. तो तिसऱ्या पिढीतही पाहायला मिळतो.
आघाडीमध्ये अहमदनगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आलाय. मात्र ही जागा सुजय विखेंसाठी काँगेसला सोडावी असा आग्रह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरला. मात्र विखेंचं वर्चस्व कोणत्याही परिस्थितीत निर्माण होऊ द्यायचं नाही अशीच भूमिका पवारांनी घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपात जाण्याचा मार्ग सुजय विखेंनी निवडलाय. गेल्या चार वर्षांपासून सुजय विखेंनी नगरमध्ये जनसंपर्क वाढवणं सुरु केलं आहे.
खासदार दिलीप गांधींचं काय होणार?
सुजय विखेंचं भाजपात जाण्याचं निश्चित झाल्याने आता विद्यमान खासदार दिलीप गांधींच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून गांधींवर पक्षांतर्गत नाराजी वाढत चालली होती. तसेच मंत्रीपदासाठी लॉबिंग केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे गांधींचा उमेदवारीचा पत्ता कट होणार हे आधीच बोललं जातं होतं. मात्र सुजय विखेंचा भाजपात प्रवेश झाल्यास गांधींचा पत्ता आपोआप कट होणार हे निश्चित आहे.
सुजय विखेंना राष्ट्रवादीकडूनही ऑफर
सुजय विखेंना पक्षात खेचण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. सुजय विखे भाजपात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारीची ऑफर दिल्याचं बोललं जातंय.