अहमदनगर : खासदार सुजय विखे यांनी कर्जत जामखेडचे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टिका केली आहे. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याची घरं फोडली. त्यांनी घरं फोडण्याची भाषा करू नये, असा घणाघात सुजय विखे यांनी केलाय. राजकारणासाठी त्यांनी लोकांची घरं फोडली. त्यांनी आत घरफोडीवर बोलू नये, असं सुजय विखे (Sujay Vikhe Patil) म्हणालेत.
पवारांनी राजकारणासाठी इतरांची घरं फोडली. आता त्यांचं घर फुटणार नाही. अशी त्यांनी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पवारांनी बीड आणि आमचं घर फोडलं. परमेश्वराकडून आम्हाला न्याय मिळेल. अशी आमची अपेक्षा आहे, असं सुजय विखे म्हणालेत.
सुजय विखेंनी शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराची खिल्ली उडवली आहे. शिर्डीला प्रसादलयात जेवण आणि नाष्टा फुकट आहे. खोल्या राहायला मोफत आहेत. सर्व मोफत असल्याने इथं चिंतन शिबिर घेत आहेत, असं सुजय म्हणालेत.
स्वस्तात कसं चिंतन शिबिर उरकेल, याच दृष्टिकोनातून शिर्डीची निवड केली. काँग्रेसचं चिंतन शिबिर झालं. तेव्हा सरकार पडलं राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर झालं की पक्ष फुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
जेव्हा सत्तेत स्वार्थ होता, तेव्हा एकमेकांसोबत होता. आज सत्ता नसल्यामुळे ते एकत्र येणार नाही. तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली त्यामुळे ते बैठकीला एकत्र येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केलीय.
महाविकास आघाडीचे सर्व लोक अंधारात संपर्क असतात. हे फक्त दिवसा म्हणतात की यांचे पाच नेते फुटले, सहा नेते फुटले. आमचे आमदार फुटलेले नाही. आज 160 आहेत. ते आमच्यासोबत आहेत. उद्या 160 चे 200 आमदार होतील, असं विखे यांनी म्हटलंय.