अहमदनगर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील उद्या (11 मार्च) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिढा कायम असताना, सुजय विखे पाटील यांच्या राजकीय हालचाली आघाडीसाठी धक्का देणाऱ्या ठरत आहेत. आता सुजय विखेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याने आघाडीला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसणार आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे उपाध्यक्षपद आणि दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही सुजय विखे पाटील यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. दक्षिण अहमदनगर लोकसभा जागेसाठी सुजय विखे इच्छुक आहेत. मात्र, ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपच्या दिशेने आपला प्रवास सुरु केला आहे.
शनिवारी (9 मार्च) नगरहून भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील हे एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे रवाना झाले होते. कोणत्या कारणासाठी दोघांनी एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. हे स्पष्ट नसलं, तरी या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
विखे-महाजनांचा एकाच हेलिकॉप्टरमधून राजकीय खळबळ उडवणारा प्रवास
सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला येते आणि राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही.
दक्षिण नगरच्या लोकसभा जागेसाठी राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे आघाडीत ज्या दोन-तीन जागांबाबत अद्याप तिढा आहे, त्यात दक्षिण नगरच्या जागेचा समावेश आहे. किंबहुना, याच जागेवरुन सर्वाधिक तिढा आहे. त्यात थेट विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी गोची झाली आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीही जागा सोडण्यास तयार नाही.