अहमदनगर : अहमदनगरच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काका आघाडीच्या घोटात सामील झाले आहेत. चुलते अशोक विखे पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा दिला आहे. अशोक विखेंनी आघडीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप यांची भेट घेतली. आमदार अरुण जगताप आणि अशोक विखेंमध्ये निवडणुकी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा झाली. अशोक विखे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
यावेळी बोलताना अशोक विखे यांनी मी आणि अरुण जगताप बालमित्र आहे. मात्र सुजय, राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनी विखे यांचं राजकारण अन्यायकारक असल्याचा आरोप अशोक यांनी केला. हे आमच्यातील महाभारत असून न्याय आणि नितीचा लढा असल्याचा दावा अशोक विखेंनी केला आहे.
सुजयविरोधात प्रचार करणार
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे आता डॉ सुजय विखेंच्या विरोधात प्रचार सुरु करणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विखे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. तीनच दिवसांपूर्वी अशोक विखे पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत भाऊ राधाकृष्ण विखेंवर खळबळजनक आरोप केले होते.
राधाकृष्ण विखेंच्या संस्थेने झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून 2 कोटींचा फंड घेतल्याचा आरोप अशोक विखे पाटील यांनी केला होता. तसेच भाजपने अनेक प्रकरणातून राधाकृष्ण विखे पाटलांना वाचवल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर सुजय विखे विकासाचा दावा करत आहेत, मात्र सर्व खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोण निवडून येतं याच्याशी मला कर्तव्य नाही, सुजय विखेंना पाडणे याच्याशी हे माझं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले होते. निवडणूक संपेपर्यंत मी जिल्ह्यात मुक्काम करणार असून, सुजय विखेंविरुद्ध प्रचार करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.