मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. जरी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला आज बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची विचारपूस केली असं सुनील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
सजंय राऊत यांना जामीन कधी मिळणार? याबाबत बोलताना सुनील राऊत म्हणाले की, सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा होता हा इतिहास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. पुढे उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. कोणीही कितीही दावा केला तर ओरिजनल ते ओरिजनल आणि गद्दार ते गद्दराच राहणार आहेत, असेही सुनील राऊत याववेळी म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र प्रत्यक्षात सरकार मात्र देवेंद्र फडणवीस हे चालवतात. सरकार चालवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री मजबूत होते, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं आहे, ते जगातला कुठलाही मुख्यमंत्री करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच कोरोना अटोक्यात आला.
उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी कोरोना काळात निर्बंध घातला म्हणूनच आपण यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करू शकत आहोत. असंही यावेळी सुनील राऊत यांनी म्हटलं आहे.