Sunil Tatkare नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गज नेते पक्षबदलाच्या तयारीत आहेत. अनेकांनी यापूर्वीच सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर दिग्गज नेते छगन भुजबळ आणि आता सुनील तटकरे यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.
छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे सुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असताना, तटकरेंनी टीव्ही 9 कडे याबाबतची प्रतिक्रिया दिली.
तटकरे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझ्या पक्षांतराची बातमी निव्वळ खोडसाळपणा आहे. अशा बातम्यांना तातडीने आळा बसायला हवा. अशा खोट्या बातम्या चालूही नयेत” अशी संतप्त प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.
मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पक्षांतराबाबत कोणतीही चर्चा केली नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
छगन भुजबळांनीही चर्चा फेटाळल्या
दरम्यान, छगन भुजबळ यांनीही शिवसेना प्रवेशाच्या चर्चा तूर्तास फेटाळल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेतल्या नेत्यांशी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत होतं. छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चांवरुन भुजबळांना प्रवेश देण्यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचंही सांगण्यात आलं. भुजबळांना प्रवेश देऊ नये असा म्हणणारा शिवसेनेतला गट सक्रिय झाल्यामुळं भुजबळांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र भुजबळांनी या वृत्तांमध्ये काही तथ्य नसल्याचं म्हटलं.
संबंधित बातम्या