कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात (Maharashtra Political Crisis) उपस्थित झालेले मुद्दे पहिल्यांच उभे राहिले आहेत, असं याआधी कधीच झालं नव्हतं’, असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam News) यांनी म्हटलंय. आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court hearing on Shiv sena) सुनावणी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होऊ शकतं, यावर उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आजच्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यायची की नाही, याबाबत युक्तिवाद होईल आणि यात मुलभूत प्रश्नाबाबत घटनापीठ विचार करुन काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, असं निकम यांनी म्हटलं.
उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी घटनापीठासमोर 11 प्रश्न उपस्थित केले आहेत. पाच सदस्यांच्या घटनापीठाला या प्रश्नांबाबत निकाल देताना विचार करावा लागणार आहे. सोबत राजकीय पक्षांमध्ये फूट पडली, तर निवडणूक आयोगापुढं काय अधिकार असतील, हे देखील निकालातून स्पष्ट करावं लागणार आहे.
धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल, याची शक्यता फार तुरळत आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईबाबत सुप्रीम कोर्ट स्थगिती देतं की कारवाईसाठी परवानगी देतं, हे प्रामुख्यानं पाहावं लागेल, असं निकम यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वेगवेगळ्या प्रकरणांची खिचडी झाली आहे. त्यामुळे घटनापीठ तातडीने निर्णय लावण्याची शक्यता कमी आहे. कायद्याचा अभ्यासक म्हणून हा विषय ऐतिहासिक असणार आहे. या प्रकरणाचा निकाल देतानाही घटनापीठाला अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करावा लागणार आहे, असंही निकम यांनी म्हटलंय.
धनुष्यबाण या चिन्ह्यावर शिंदे गटाने दावा केलाय. तर दुसरीकडे आपणच खरी शिवसेना आहोत, असंही म्हटलंय. यामुळे तयार झालेला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच गुंतागुंतीचा बनलाय. त्या सगळ्यावर आजच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद होईल. या युक्तिवादात प्रामुख्याने निवडणूक चिन्हावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक बाब म्हणजे सुप्रीम कोर्टात होणारी ही सुनावणी देशातील जनतेला लाईव्ह पाहता येणार आहे.