बारामती : राष्ट्रीय वयोश्री योजना बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्यात आल्यामुळे हा मतदारसंघ देशात नंबर वन ठरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापेक्षाही अधिक बारामती लोकसभा मतदारसंघात झाल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. बारामतीत शुक्रवारी 15 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वाटप केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसीस सेंटरचं उद्घाटन, पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आणि जेजुरी नगरपरिषदेतील संविधान स्तंभ लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेत बारामती लोकसभा मतदारसंघ वाराणसी मतदार संघाच्याही पुढे गेल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
या मतदारसंघात तब्बल 11 हजार 737 लाभार्थ्यांना साहित्य वाटप झालं असून वयोश्री योजना प्रभावीपणे राबवणारा बारामती हा देशातला नंबर वन मतदारसंघ ठरल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याचवेळी या योजनेच्या साहित्य वाटप कार्यक्रमासाठी 15 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहितीही सुप्रिया सुळे यांनी दिली.
या कार्यक्रमात विविध नेत्यांनी शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवत आहेत. जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठिशी राहिल, अशा शुभेच्छा दिल्या. त्याचाच धागा पकडून सुप्रिया सुळे यांनी आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय असं वाटल्याने आपल्या पोटात गोळाच आला होता. असं सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडीची सत्ता आल्यास सर्वप्रथम अजितदादा जेजुरीच्या 250 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर पहिली सही करतील अशी ग्वाही दिली.