अभिजित पोते, पुणे : ज्या सरकारवर एक आठवड्यापूर्वी तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले. निवडणूक (Election) निकालानंतर त्याच पक्षाच्या नेत्यांसोबत सरकार स्थापन करता, हे कसं होऊ शकतं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न विचारलाय. ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकांवरून सुप्रिया सुळे यांनी हा सवाल केलाय. मेघालयचे सध्याचे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याचं खुद्द अमित शहाच म्हणाले होते. आता त्यांनी त्याच पक्षासोबत सरकार स्थापन केलंय. यावरून सुळे यांनी अमित शहांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी केलेल्या ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेचं काय झालं, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय.
पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली. भाषणादरम्यान, त्या म्हणाल्या, ‘ आपण डेटाने जाऊयात. मी राष्ट्रवादीत काम करते म्हणून तेच बोलावं, असा आग्रह नसतो. कुणीही चांगलं काम केलं तर त्यावर बोलायला पाहिजे. मी
मेघालयचा शपथविधी बघत होते. मागच्या आठवड्यात अमित शहांचं बोलणं ऐकलं होतं. मेघालयातलं सगळ्यात करप्ट सरकार आताचं होतं, असे शहा म्हणाले. त्यानंतर निवडून आल्यावर ज्यांच्याबद्दल अमित शहा बोलले, त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केलं. मी संसदेत हेच बोलणार आहे. २०१४ मध्ये खूप विश्वासाने मा. प्रधानमंत्रींची मागे उभा राहिला. त्यांनी खूप चांगली गोष्ट सांगितली होती. काही बाबतीत त्यांनी शब्द दिला होता. ना खाऊंगा ना खाने दुंगा… असे म्हणाले होते. त्यामुळे जेव्हा अमित शहा जेव्हा एखाद्या सरकारला सर्वात भ्रष्टाचारी म्हणता आणि 10 दिवसानंतर त्याच सरकारसोबत सरकार बनवता. मग त्या घोषणेचं काय झालं, हा माझा सोपा आणि सरळ प्रश्न आहे.
तर हिंदु महासभेचे नेते आनंद दवे यांनीही भाजपवर टीका केली आहे. भाजपा आपलं हिंदुत्व सत्तेसाठी किंवा सत्तेवर येण्यासाठीच वापरतं हे आता उघड झाल आहे. ईशान्य भारतात भाजपने हिंदू विरोधी पक्षासोबत जाऊन काय साध्य केले ?
मेघालय , नागालँड निवडणुकीवरून आनंद दवे यांनी हा सवाल केलाय. भाजपचं हिंदु प्रेम हे बेगडी आहे. ज्या संगमा यांचं वर्णन भाजपने औरंगजेब असं केला होता, आता संगमा हे यांना गोड वाटतायत का? भाजपाची आता काँग्रेस होत आहे, असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.
मेघालयमध्ये कोनराड संगमा हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोनराड संगमा यांच्या एनपीपीला २६ जागा मिळाल्या तर भाजपने फक्त २ जागा जिंकल्या. मेघालयात कोनराड संगमा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं असून भाजप, युनायटेड डेमोक्रेटिक पार्टी आणि पिपल्स डेमोक्रेटिक फ्रंट यांनी एनपीपीच्या नेतृत्वाखालील युतीला पाठिंबा दिला आहे.