पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना बंद पुकारणं योग्य नाही. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवले, त्यांच्यासाठी बंद हे जरा चुकीचे वाटतं. यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule on Sangali Bandh) व्यक्त केलं.
सांगली बंद करणे हे दुर्दैव आहे. छत्रपतींनी मेहनत करुन आदर्श घडवून दिला. गरीब कष्टकऱ्यांचा बाजार बंद करुन सांगलीकरांचे नुकसान केलं जात आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे व्यक्त केली. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
संजय राऊत यांनी काल आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात असलेल्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. देशात आज इतके गंभीर प्रश्न असताना कुठल्या प्रश्नांकडे किती लक्ष द्यायचं, हे ठरवावं, असा सल्लाही सुप्रिया सुळेंनी दिला. जाणता राजा ही भूमीका नाही, मात्र जनतेनं त्यांना ती उपाधी दिली आहे, असं उत्तर सुप्रिया सुळेंनी सुरु असलेल्या वादावर दिलं.
अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेना आवश्यक, पण उद्धवराव, राऊतांना हटवा : संभाजी भिडे
प्रत्येकाला आक्षेप नोंदवण्याचा अधिकार आहे, आमचं दडपशाहीचं सरकार नाही, हाच फरक त्यांच्यात (फडणवीस सरकार) आणि आमच्यात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मनमोकळ्या मनाने टीका करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करत राहू त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, असा टोलाच सुप्रिया सुळे यांनी लगावला.
‘आरे’बाबत दुर्दैव आहे, की आधी आम्ही झाडं तोडू नका यासाठी विरोध केला. ती झाड आधीच्या सरकारने तोडली, पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता अतिशय असंवेदनशीलपणे सरकारने निर्णय घेतले. त्यामुळे आरे आणि इतर विकास कामे पर्यावरणाचा विचार करूनच आमचं सरकार करेल, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.
माहुलवासियांच्या आंदोलनात मी स्वतः लक्ष घालून, माहिती घेऊन सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रांजळ प्रयत्न करणार आहे, असं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule on Sangali Bandh) दिलं.