सोलापूर : देशात आणि राज्यात ईडी आणि सीबीआय चौकशीवरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पवार कन्या म्हणजेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारला ललकारलं आहे. माझ्याविरोधात ईडीची नोटीस (ED) काढून दाखवा, असं खुलं आवाहन सुप्रिया सुळेंनी सोलापुरात दिलं.
सुप्रिया सुळे ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी व्यापारी, विद्यार्थी, वकील, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.
मी काही केलंच नाही तर कुठून ईडी आणि सीबीआयची नोटीस पाठवणार? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. थोडे दिवस ईडी-सीबीआयवाले ताणतील, मात्र शेवटी मीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. जरी त्रास झाला तरी पर्वा नाही संघर्ष करायला मजा येते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आधी आमची सत्ता होती. एसी होता. सगळं काही गोल-गोल होतं. मात्र आता आमची सत्ता नाही. आता आम्हाला रस्त्यावर येऊन संघर्ष करायला मजा येत आहे, असंही त्या म्हणाल्या.
एखादी मोबाईल कंपनी चांगली ऑफर देते त्यावरुन ग्राहक मोबाईल बदलतात, त्याचप्रमाणे ऑफर मिळाली की राजकीय नेते विचारधारा वगैरे न पाहता पक्षांतर करतात, याची खंत सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली. सीबीआय, ईडी, बँका आणि साखर कारखाने या चार मुख्य कारणांमुळेच नेते पक्षांतर करत असल्याचं त्या म्हणाल्या. आतापर्यंत पक्षांतर करणाऱ्या कोणत्याही नेत्याने पक्षाविरुद्ध बोललं नसल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी सोडून भाजप, शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांवरही सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला. पक्ष सोडून जात असतील त्यांना मनापासून शुभेच्छा, मात्र अनेक वर्ष सोबत असलेले सहकारी सोडून जात असल्याचं दु:खही सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलं.
यंदाच्या निवडणुकाच्या निकालाची मला प्रचंड उत्सुकता आहे. पक्षांतर केलेल्या नेत्यांना किती मतं मिळतात, हे पाहायचं आहे. मात्र पक्षांतर केलेल्या नेत्यांमुळे सरकार कोणाचंही आलं, तरी मंत्री आमचेच होणार अशी मिष्कील टिपण्णीही सुळेंनी केली.
सरकार ईडी आणि सीबीआयला हाताशी धरुन सूडबुद्धीने कारवाई करत आहे, असा आरोप अनेक विरोधक भाजप सरकारवर करत आहेत. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनाही आयएनएक्स मीडियातील कथित घोटाळ्याच्या आरोपात सीबीआयने अटक केली आहे.