वाद दीराशी, नवरा कशाला सोडायचा? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोमणा

| Updated on: Sep 11, 2019 | 6:18 PM

राहुल गांधी, हर्षवर्धन पाटील आणि माझी कधीच भेट झाली नाही, असा दावा करत भांडण दिराशी आणि नवरा कशाला, सोडता असा टोमणाही सुप्रिया सुळे (Supriya Sule Harshvardhan Patil) यांनी लगावला.

वाद दीराशी, नवरा कशाला सोडायचा? सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोमणा
Follow us on

औरंगाबाद : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule Harshvardhan Patil) यांनी मिश्कील भाष्य केलंय. हर्षवर्धन पाटील यांचं भाषण ऐकून मी खुप वेळा त्यांना फोन केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राहुल गांधी, हर्षवर्धन पाटील आणि माझी कधीच भेट झाली नाही, असा दावा करत भांडण दीराशी आणि नवरा कशाला, सोडता असा टोमणाही सुप्रिया सुळे (Supriya Sule Harshvardhan Patil) यांनी लगावला.

औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात बोलताना सुप्रिया सुळेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये अलिबाबा आणि 40 चोर असं म्हटलं होतं. आता त्यापैकी अनेक जण त्यांनी स्वतःच्या पक्ष घेतले आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश

काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. पूर्वीपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू आणि त्या जागांमध्ये आता इंदापूरच्या जागेचाही समावेश झालाय, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इंदापूरची उमेदवारीही हर्षवर्धन पाटलांना जाहीर केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश पार पडला.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात यावं यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहत होतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर हर्षवर्धन पाटील लोकसभेपूर्वी आले असते तर बारामतीत भाजपचा खासदार असता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, हा इंदापूरच्या जनतेचा निर्णय असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हर्षवर्धन पाटलांच्या घरी गेलो, तरीही भेटले नाही : अजित पवार

हर्षवर्धन पाटील विनाकारण पवार कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत. इंदापूरमधील त्यांच्या सभेनंतर मी 50 ते 55 फोन केले, घरीही जाऊन आलो, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

इंदापूरच्या जागेचा वाद

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे तब्बल चार वेळा इंदापूरचे आमदार म्हणून निवडून गेले. 2009 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निभाव लागला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात लढत झाली. सलग चार वेळा विधानसभा जिंकणारे हर्षवर्धन पाटील यांना 2014 मध्ये मात्र राष्ट्रवादीने पराभूत केलं.

संबंधित बातम्या :

मनगटात दम आहे तोच इंदापूरला पाणी देऊ शकतो, हर्षवर्धन पाटलांचा निशाणा

इंदापूरची जागा कुणाला? अजित पवार म्हणतात…

इंदापूरची जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसकडेच राहील : विश्वजित कदम 

इंदापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला भाजपची खुली ऑफर?

हर्षवर्धन पाटील अनेक मुख्यमंत्र्यांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट होते : मुख्यमंत्री