औरंगाबाद : मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आणि भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला. त्यामुळे थेट सुप्रिया सुळे यांनाच माईक हातात घेऊन कार्यक्रम नियंत्रणात आणावा लागला (Supriya Sule warn NCP supporters). कार्यक्रम नियंत्रणात आला खरा, मात्र ज्यांनी राडा केला त्यांना पक्ष धडा शिकवणार का? असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होतो आहे.
सुप्रिया सुळे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या असता त्यांना पैठणमध्ये कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागला. पक्षातील अंतर्गत संघर्ष हा इतका टोकाचा होता की अखेर सुप्रिया सुळे यांना राडेबाज कार्यकर्त्यांना आपल्या बापाला या पक्षासाठी रक्त गाळावं लागल्याची आठवण करून द्यावी लागली. कार्यकर्त्यांच्या तुफान राड्यात सुप्रिया सुळे यांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी झाली होती. मात्र, सुप्रिया सुळे यांनी गटबाजीचं हे चक्रव्यूह भेदत राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सार्वजनिकपणे सज्जड इशारा दिला.
“तुमचं जे काही वागणं सुरु आहे ते पत्रकार उद्या वर्तमानपत्रात लिहिणार आहेत. मी गोष्ट सांगते, तुम्हाला तुमच्या पक्षाच्या सार्थ अभिमान नसेल, मात्र माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष बांधला आहे. शरद पवार 80 वर्षांचे आहेत. असंख्य कार्यकर्त्यांनी रक्त गाळून, घाम गाळून मागील 50 वर्ष पक्ष आणि संघटना बांधली आहे. त्यात एकटे शरद पवार नाही, तर असंख्य कार्यकर्ते आहेत. त्याला गालबोट लावायचा कोणीही प्रयत्न केला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे.”
शुक्रवारी (21 फेब्रुवारी) सकाळी सुप्रिया सुळे पैठण शहरात पोचल्या. सकाळी सकाळी कर्यकर्त्यांसमोर सुंदर भाषण करावं. 80 वर्षांच्या तरुणाने केलेल्या पराक्रमाची कहाणी सांगावी असं त्यांच्या डोक्यात होतं. मात्र, घडलं भलतंच. राष्ट्रवादीचे पैठण विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार दत्ता गोर्डे यांनी भाषण करताना त्यांचेच सहकारी संजय वाकचौरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे चवताळलेल्या वाकचौरे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत दत्ता गोर्डे यांचं भाषण बंद पाडलं
“मी सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे सांगते आहे, की माझ्या संघटनेत आदरणीय शरद पवारांचे कष्ट आणि रक्त आहे. महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना साथ दिली. त्यामुळेच हा पक्ष उभा राहिला आहे. या सर्वांनी जे रक्त गाळलंय, जी तपस्या केली त्यापुढे मी नतमस्तक होते. तुम्ही शरद पवारांना साथ दिली आहे. तुम्हाला मानाचा मुजरा करते. मात्र, तुमच्यापैकी कुणीतरी मुद्दामहून या हॉलमध्ये येऊन माझ्या संघटनेची बदनामी केली. ही बदनामी सुप्रिया सुळे खपवून घेणार नाही.”
सभागृहात सुरु झालेला राडा इतका टोकाचा होता की गोर्डे आणि वाकचौरे यांचे समर्थक आपापल्या नेत्यांनी विनंती करुनही ऐकायला तयार नव्हते. सरते शेवटी सुप्रिया सुळे यांनाच आक्रमक होऊन माईक हातात घ्यावा लागला. पण तरीही ऐकतील ते पैठणकर कसले. शेवटी सुप्रिया सुळे यांना दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे यांनाच मंचावरून उतरवून थेट सभागृहाच्या बाहेर काढावं लागलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नमतं घेत सभागृहात थंडपणा घेतला.
“जसं मला गोड बोलता येतं, तसा मला संघर्षही करता येतो. मी कुठल्या बापाची लेक आहे हे कुणीही विसरु नये. श्रमलेल्या बापाची मी लाडकी लेक आहे, पण त्याची कहाणी बुलंद आहे. ही बुलंद कहाणी ही लेक महाराष्ट्रा पुढे नेईल. ही हुल्लडबाजी मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिली आहे. मला ही हुल्लडबाजी आवडलेली नाही. ही ना महाराष्ट्राची संस्कृती आहे, ना पक्षाची संस्कृती. त्यामुळे आज पहिल्यांदा पैठणबद्दल माझ्या मनात एक कटू आठवण तयार झाली आहे. ही आठवण आयुष्यभर राहिल. आता तुम्ही ठरवायचं आहे की गोड आठवणी जिवंत ठेवायच्या की कटू. मी एक अतिशय संवेदनशील महिला आहे. माणसांच्या भावना मला कळतात.”
दत्ता गोर्डे आणि संजय वाकचौरे या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली ती नुकत्याच पर पडलेल्या विधानसभा निवडणुकीत. संजय वाकचौरे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार त्यांनी यावेळी तिकिटावर आपला दावा सांगितला, मात्र भाजपमधून आयात केलेल्या दत्ता गोर्डे यांच्या गळ्यात तिकिटाची माळ पडली. पण त्यातही तिकीट नाट्य घडलं. ऐनवेळी वाकचौरे आणि गोर्डे या दोघांनाही पक्षाने बी फॉर्म देऊन टाकला. गोर्डे यांनी लवकर जाऊन बी फॉर्म भरला आणि वाकचौरे कासवाच्या वेगाने गेले. परिणामी उशिरा आल्याचं कारण देत प्रशासनाने वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज नाकारला. तिथूनच वादाची ठिणगी पडली. त्याच ठिणगीचा आज मेळाव्यात भडका उडाला. आता या भडक्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राडेबाजांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित व्हिडीओ: