बीड : जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन या जमीन घोटाळ्याबाबत (Land scam) सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आष्टीतील देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्राद्वारे धस यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपाला उत्तर देताना धस यांनी शिरुरमधील जाहीर सभेत आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली होती. दादागिरी आम्हाला दाखवू नका. तुम्ही स्वर्गीय अण्णांना फसवून पुढे आलात. मी त्यांचा पुत्र आहे. नवाबभाई सध्या दोनच माणसांच्या मागे लागले आहेत. एक वानखेडे आणि दुसरे जमीन हडप करणारे, असं म्हणत मुंडे यांनी सुरेश धस यांचं नाव न घेता जोरदार टीका केली होती.
मुंडे यांच्या या टीकेला उत्तर देताना धस यांनी आपल्या अंदाजात प्रत्युत्तर दिलं. काय भाषण, काय बोलणं… शोभतं का? थोडं हिशेबात बोला. टीका-टिप्पणी करताना उगीच दुसऱ्याचा अपमान करायचा असं काहीही बोलायचं. तुमचं सरकार आहे, मग करा चौकशी, करा तपास, उगाच ढगात गोळ्या मारण्याचं काम करु नका, असं धस म्हणाले.
धस यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना विरोधकांना थेट आव्हान दिलंय. ‘औरंगाबादला पत्रकार परिषद घ्यायची. इकडे भ्रष्टाचार, तिकडे आमकं. माझ्याकडे हजार कोटींचा आकडा सांगितला. हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं सगळं सोडून जातो’, असंही धस म्हणाले. त्याचबरोबर ‘मला हजार कोटी नको. मला पन्नास कोटीच द्या. माझ्या बाप-जाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे. ती घरादारासकट तुमच्या नावावर करुन देतो. अख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नासच द्या, हजार कशाला’, असं उत्तर धस यांनी दिलंय.
देवस्थान आणि वक्फ बोर्ड यांच्या जमिनी या प्रकार दोन मध्ये येतात. या जमिनी कोणाच्याही नावावर होत नाहीत. या जमिनी देवस्थानच्या नावावर असतात किंवा त्यानंतर त्या सरकारी होतात. मात्र, सुरेश धस यांनी या जमिनीचा पद्धतशीर व्यवहार केला आहे. सुमारे 450 एकर जमीन त्यांनी बळकावली आहे. त्याचे बेकायदेशीर फेरफार केले आहेत. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इतर बातम्या :