जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. या कारवाईचं भाजपने राजकारण केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण यातच आता काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी एक नवा दावा केलाय. काँग्रेस सरकारच्या काळात आम्ही 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक केला, पण याची कधी चर्चाही केली नाही, असं ते म्हणाले. राजस्थानमधील सर्वच्या सर्व 25 जागा जिंकणार असल्याचा दावाही गहलोत यांनी केला.
जनता भोळी आहे. जनतेला वाटतं मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलाय. या अगोदरही 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालाय. काँग्रेसच्या काळात 15 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाला, पण त्यावर कधी आम्ही चर्चा केली नाही. कायद्याने हे करताही येत नाही, पण तुम्ही (पंतप्रधान मोदी) जाहीरपणे सांगताय, असं अशोक गहलोत म्हणाले.
इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगलादेशची निर्मिती केली. त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, पण नव्या खलिस्तानची निर्मिती होऊ दिली नाही. पण मोदी गांधी कुटुंबाविषयी सतत वाईट बोलत राहतात, या गोष्टींचा साधा उल्लेखही करत नाहीत, असं म्हणत मोदी सरकारने आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला. मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे दोन चेहरे आज देशावर ज्या पद्धतीने राज्य करतात, ते दुर्दैवी असल्याचंही गहलोत म्हणाले.
सध्या लोकशाही धोक्यात आहे, संविधानही धोक्यात आहे, देश धोक्यात आहे. राजस्थानमध्ये आम्हीच निवडणूक जिंकू. आमचं मिशन 25 सुरु आहे. कारण, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. या सरकारचा अंत लवकरच आहे, असंही गहलोत म्हणाले.