सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड, नितेश राणेंनी आभार मानले म्हणाले….

| Updated on: Dec 29, 2022 | 1:57 PM

रुपकुमार शाह यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी सुशांतसिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंग कीर्ती यांनी केली होती.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मोठी घडामोड, नितेश राणेंनी आभार मानले म्हणाले....
Image Credit source: social media
Follow us on

नागपूरः अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एसआयटी (SIT) नेमण्यात आली आहे. तसेच आज या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रुप शाह याला महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Govt) वतीने विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचा दावा नितेश राणे यांनी वारंवार केला आहे. याच आत्महत्येचा प्रमुख साक्षीदार रुप शहा असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे का, हे तपासून पाहण्यासाठी सखोल तपासाची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

शिंदे गट आणि भाजप नेत्याच्या जोरदार मागणीनंतर या प्रकरणाची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम मार्फत चौकशी केली जात आहे. त्यानंतर या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रुपकुमार शाह यांनी दावा केला आहे.

रुपकुमार शाह कोण?

सुशांतसिंह राजपूत याचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या टीममध्ये रुपकुमार शाह यांचा समावेश होता. हे पोस्टमॉर्टेम कूपर रुग्णालयात झालं होतं. रुप शाह यांनी दावा केलाय की, सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह रुग्णालयात आणला, त्यावेळी त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. एवढ्या जखमा झालेला व्यक्ती स्वतःहून गळफास घेऊ शकत नाही.

मात्र त्यावेळी माझ्यावर दबाव आणला गेला. म्हणून मला यंत्रणेविरोधात बोलता आलं नाही, असं वक्तव्य रुपकुमार शाह यांनी केलंय.

तर शाह यांचा दावा खरा असेल तर त्यांना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच रुपकुमार शाह यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी सुशांतसिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंग कीर्ती यांनी केली होती.

त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने रुपकुमार शाह यांना संरक्षण दिले आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीतील तरुण नेत्याचा हात असू शकतो, अशी शक्यता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.