मुंबई : सध्या आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यानंतर आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील जोरदार टीका केली आहे. त्यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं. बच्चू कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही, त्यांचा विश्वासघात झाला आहे. ते स्वाभीमानी नेते आहेत मात्र बच्चू कडू यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आज बच्चू कडू आणि रवी राणा आमने-सामने आहेत. उद्या भाजप आणि शिंदे गट एकोमेंकांच्या उरावर बसतील. शिंदे गटात सर्वच जण स्वार्थासाठी गेले. मात्र आता एकालाही मंत्रीपद मिळणार नसल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपला प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा यांनी खोके घेतल्याचे पुरावे द्यावेत अन्यथा आम्ही एक नोव्हेंबरला सात ते आठ आमदार मिळून वेगळा निर्णय घेऊ असा इशारा कडू यांनी दिला आहे.