नजीर खान,परभणी : बागेश्वरबाबांची (Bageshwar baba) सिद्धी मला प्राप्त नाही.. नाही तर कोणतं वक्तव्य नेमकं खरं आहे आणि कोणतं खोटं आहे, हे मला कळालं असतं.. असं वक्तव्य सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलंय. समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखू शकतात तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीची इत्थंभूत माहिती सांगू शकतात, असा दावा आध्यात्मिक गुरू बागेश्वर धाम येथील बागेश्वरबाबा ऊर्फ धीरेंद्र शास्त्री करतात.ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज परभणीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवगर्जना अभियानाअंतर्गत परभणीत आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य नुकतंच चर्चेत आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी टोला लगावलाय.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतंच एक वक्तव्य केलंय. ते म्हणाले, ‘ एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत. आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. मी मेंटल आहे का? तुम्ही कोणत्याही गोष्टीत जातिवाद करता, मी जो त्याग केला तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी केला.. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसतो यातच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. राजकीय वर्तुळात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना याच वक्तव्यावरून कैचीत पकडलंय. त्या म्हणाल्या, गुलाबराव पाटील यापूर्वी खोटं बोलत होते असं समजावं का? आधी गुलाबराव म्हणत होते मी हिंदुत्व वाचवायला गेलो. मला साहेब भेटत नव्हते म्हणून गेलो. त्यामुळे ते आता खोटं बोलतायत की पहिले खोटं बोलत होते? त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही तेव्हाचे खरे होते की आताचे खरे आहेत? माझ्याकडे बागेश्वर बाबाची सिद्धी नाही त्यामुळे आता गुलाबराव पाटील असं का विधान करतात हे मी सांगू शकत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपाला पराभव स्पष्ट दिसत आहे. म्हणून देवेंद्र फडवणवीस यांनी अर्ध मंत्रिमंडळ पुण्यातील प्रचारात उतरवंलय. त्यानंतरही अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी आजारी गिरीश बापट यांनाही प्रचारात आणल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली. कसपा पेठ आणि चिंचवड मतदार संघात उद्या २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विरोधात भाजप अशी प्रतिष्ठेची लढत इथे पहायला मिळणार आहे.