मुंबईः सार्वजनिक ठिकाणी महिलांनी कसे कपडे घालावेत यावरून उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद सुरु असतानाच सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या वादात उडी गेतली आहे. काल फेसबुक पोस्ट शेअर केल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी या विषयावर उघड भाष्य केलं. महिलांनी कोणते कपडे घालावेत, यासारख्या बाष्कळ विषयांवर चर्चा होते. पण गंभीर विषयांकडे लक्ष दिलं जात नाही. ही चर्चा करतानाही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं, असा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थिती लावली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर भूमिका मांडली.
त्या म्हणाल्या, ‘ मी साडी नेसते मला साडीत कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. पण माझ्यासारखाच पेरहाव इतरांनी करावा असा माझा अट्टहास नाही…
मुळात हे सगळं नॉन इशूज आणि बुलशीट इश्यू या देशात काढले जातात… कधी तुम्ही बुरखाच का घालतात. म्हणून आतताईपणा करायचा, कधी तुम्ही कपडे का घालत नाही म्हणून आतताईपणा करायचा…. हे योग्य नाही, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.
सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमाचा दाखला दिला. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती एका कार्यक्रमात असताना रामदेव बाबांनी अत्यंत वादग्रस्त स्टेटमेंट केलं. महिलांनी कपडे नाही घातले तरी ते चांगल्या दिसतात, त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही…
म्हणजे आक्षेप नोंदवताना किंवा चर्चेची राळ उठवताना समोरची व्यक्ती कोणत्या जातीची धर्माची, ती व्यक्ती कोणता दृष्टिकोन घेऊन वावरते हे बघून जर कोणी आक्षेप नोंदवत असेल तर हे अत्यंत वाईट आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.
केतकी चितळे असतील किंवा या सगळ्या तत्सम महिला असतील… त्यांच्यावर कधी टीकेची राळ उठत नाही. किंवा देवेंद्रजी कधी सभागृह बंद पडणार नाहीत.. कोणती व्यक्ती जर कोणत्या विचारधारेची असेल ते पाहून तुम्ही विरोध करणार असेल तर हे वाईट आहे.
बाकी केतकी चितळे काय बोलतात त्यावर संस्कृतीचे ठेकेदार बोलतील. ते मी बोलणार नाही. आज सावित्रीबाईंचा जन्म आहे म्हणून अजूनही महिलांचा प्रश्न का अनुत्तरित का आहेत? असा प्रश्न विचारेन….
महापालिकेत महिलांना राखीव टक्का मिळतो तर विधिमंडळात देखील तसा का असू नये ? पुरुषसत्तेचे वाहक इतके प्रबळ आहेत का की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, महिला आयोगही फार सक्रिय नाही, अशी खंत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.