मुंबईः शिवसेनेत (Shivsena) येण्यापूर्वीच्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) आणि आताच्या सुषमा अंधारे यांच्या भूमिका बदलल्या आहेत का? की सुषमा अंधारेंनी आधी घेतलेल्या भूमिका शिवसेना– ठाकरे गटाला मान्य आहेत असं आहे का? असे प्रश्न आता जाहीरपणे विचारले जात आहेत. कारणही तसंच झालंय. कोल्हापुरात सुषमा अंधारे यांनी काल अंबाबाईचं दर्शन घेतलं. शिवसेनेत येण्यापूर्वी हिंदू (Hindu) देवी-देवतांविरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या सुषमा अंधारे यांची ही कृती चर्चेचा विषय़ ठरली आहे.
सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या आधीच्या भूमिका सांगणाऱ्या व्हिडिओंचा पूर आला. आता तर सार्वजनिक ठिकाणी थेट मोठ-मोठे बॅनर्स लावूनच सुषमा अंधारे यांच्या भूमिकांवरून उद्धव ठाकरे यांना सवाल केला जातोय. चेंबूरमध्ये सुषमा अंधारेंविरोधातले बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
दलित, आंबेडकरवादी नेत्या अशी अनेक वर्षांपासून ख्याती असलेल्या सुषमा अंधारे सध्या शिवसेना ठाकरे गटाचा बुलंद आवाज म्हणवल्या जात आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी हिंदु देवी-देवतांबद्दल अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केलेली आहेत. शिवसेना प्रवेशानंतर ही वक्तव्य, व्हिडिओसहित सोशल मीडियातून तुफ्फान व्हायरल होत आहेत. आता चेंबूरमध्ये झळकलेले बॅनर्स जास्त चर्चेत आहेत.
आई तुळजाभवानीची खिल्ली उडवणाऱ्या याच त्या सुषमा अंधारे, हेच का तुमचं हिंदुत्व? असा सवाल ठाकरे गटाला करण्यात आला आहे. मराठा युवा सेनेने हे बॅनर्स लावले असून आज या संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
शिवसेनेत जून 2022 मध्ये फूट पडल्यानंतर जुलै 2022 मध्ये सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
दसरा मेळाव्यातील सुषमा अंधारे यांचं जोरदार गाजलं. त्यानंतर त्या जास्त चर्चेत आल्या. दसरा मेळाव्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सुषमा अंधारे यांनी ही भीतीदेखील व्यक्त केली होती. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी माझ्या आधीच्या भूमिकांवरून लोक तुम्हाला टार्गेट करतील, तुम्हाला प्रश्न विचारतील, अशी शंका मी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवली होती, असं सुषमा अंधारे मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी मोकळ्या मनाने शिवसेनेत प्रवेश दिला आणि माझ्या हाताला शिवबंधन बांधलं गेलं… हा प्रसंग सुषमा अंधारेंनी वर्णन केला होता.
सध्या शिवसेना ठाकरे गटातर्फे त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त महाराष्ट्रात दौरे करत आहेत. यातूनच शिंदे गटावर त्या जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे आता शिंदे गट सुषमा अंधारेंबाबत चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच मराठा युवा सेनेने घेतलेली ही भूमिका चर्चेत आहे.