नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाचा भांडाफोड करणारे जवान तेज बहादूर यादव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तेज बहादूर यादव हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाविरुद्ध नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तेज बहादूर यादव हे मोदींना वाराणसी मतदारसंघात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मोदींविरोधात अपक्ष लढून सैन्यदलात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा मानस तेज बहादूर यादव यांचा आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
जयहिंद मैं सोच रहा हूं क्यों ना बनारस से चुनाव लड़ा जाए मोदी जी के खिलाफ निर्दलीय मैं किसी पार्टी की गुलामी तो कर नहीं सकता
— Tej Bahadur Yadav (@iTejbahadur) March 28, 2019
कोण आहेत तेज बहादूर यादव?
हरियाणातील रेवाडी इथे राहणारे तेज बहादूर यादव जानेवारी 2017 मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बीएसएफने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना निलंबित केलं होतं.
जवानांना चांगलं अन्न, जेवण मिळत नाही. उन, वारा, पावसात जवान सतत उभा असतो, मात्र त्याची हेळसांड होते, असा दावा तेज बहादूर यादव यांनी केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण गृहमंत्री राजनाथ सिंहांपर्यंत गेलं होतं.
अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप
तेज बहादूर यादव यांनी याचिका दाखल करत, सैन्यातील अधिकाऱ्यांवर आरोप केला होता. जवानांच्या अन्नपदार्थाच्या बजेटमध्ये सैन्यातील अधिकारी मोठा घोटाळा करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र या सर्व प्रकारानंतर तेज बहादूर यादव यांना निलंबित करण्यात आलं होतं.
मुलाची आत्महत्या
निलंबित जवान तेज बहादूर यादव यांच्या 22 वर्षीय मुलाने याच वर्षी जानेवारी महिन्यात आत्महत्या केली होती. मुलगा रोहितने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं होतं. रोहित दिल्ली विद्यापीठात शिकत होता.