पुणे : मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने विजय मिळवला. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके नगरपरिषदेवर निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना पाडलं होतं, आता शेळकेंच्या काकीने भेगडे समर्थकालाही धूळ चारली. (Talegaon Nagar Parishad Bypoll)
भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्याच पदासाठी तळेगावात पोटनिवडणूक लागली होती. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या काकी संगीता शेळके नशीब आजमावत होत्या.
अपक्ष उभ्या राहिलेल्या संगीता शेळकेंना महाविकासआघाडीने पाठिंबा दर्शवला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांचा 795 मतांनी पराभव केला. संगीता शेळके यांना 1 हजार 452 मतं मिळाली, तर कृष्णा म्हाळसकर यांना 657 मतं पडली.
मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भाजपला धक्का
म्हाळसकर हे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडेंचा पराभव करुन सुनील शेळकेंनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. याची पुनरावृत्ती तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही झाली.
दिवस पोटनिवडणुकांच्या निकालाचा
याआधी, मुंबई महापालिकेतील मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीतही शिवसेनेने भाजपला धक्का दिला. शिवसेना उमेदवार विठ्ठल लोकरे प्रभाग क्रमांक 141 मधून विजयी झाले. लोकरेंनी भाजप उमेदवार दिनेश पांचाळ यांचा पराभव केला.
मानखुर्द प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात महाविकास आघाडीतील नवा मित्रपक्ष काँग्रेस आणि जुना मित्रपक्ष भाजप उभे ठाकले होते. मात्र शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 4 हजार 427 मतं मिळाली, तर भाजपच्या दिनेश पांचाळ यांना 3 हजार 042 मतं पडली. त्यामुळे 1 हजार 385 मतांनी दिनेश पांचाळ पराभूत झाले. काँग्रेसच्या अल्ताफ काझी यांना अवघी तीनशे मतं पडली.
राज्यात महाविकास आघाडी असताना सेनेविरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र काँग्रेसची साथ सोडलेल्या नगरसेवकाला धडा शिकवण्यासाठी पक्षाने आपला उमेदवार दिल्याची चर्चा होती.
Talegaon Nagar Parishad Bypoll