उस्मानाबाद : उजनीच्या पाणी प्रश्नावरुन सोलापूरकरांची नाराजी ओढवून घेतलेले राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सोलापूरचे शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उपनेते तथा सोलापूर संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणे यांना शिवसेनेच्या भाषेत सज्जड दम दिला आहे. (Tanaji Sawant’s warning to Dattatraya Bharane over his statement about CM)
‘पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द वापरा. आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आलात. तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादने तुम्ही सत्तेत आहात हे कधीच विसरू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहात. तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द व भाषा वापरा. तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पाहायची असेल तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा’, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.
‘फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे आणि राज्यात महाविकास आघाडी आहे. आघाडीला तडा जाईल असं वक्तव्य कोणत्याही शिवसैनिक किंवा पदाधिकाऱ्यांनी करायचं नाही, या एका बंधनात राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसलो आहोत. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या छाताडावर बसून कोणत्याही पद्धतीने नाचावं आणि आमच्या पक्षप्रमुखांबाबत गलिच्छ भाषा वापरावी. तुमच्या या वक्तव्याची योग्य वेळी योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय हा शिवसैनिक शांत राहणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असं बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असता ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या, आपलं आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं.
दरम्यान, दत्तामामांकडून या वादावर आता पडदा टाकण्यात आला आहे. भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या या वाद आता मिटण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
भुजबळ म्हणतात, सर सलामत तो हेल्मेट पचास; नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू
दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगलीकरांसाठी जयंत पाटील यांचं महत्वाचं पाऊल; कोणता महत्वाचा निर्णय?
Tanaji Sawant’s warning to Dattatraya Bharane over his statement about CM