हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी स्वत:च्या गावाप्रती सर्वात मोठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चंद्रशेखर राव (KCR) ज्या गावात राहिले, वाढले त्या गावातील प्रत्येक कुटुंबाला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली. इतकंच नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबाला नवं घर बांधून देण्यात येणार आहे.
चंद्रशेखर राव हे त्यांच्या सिद्दीपेट या जिल्हा दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी चिंतामडका (Chintamadaka) गावातील दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
गावातील नागरिकांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही अवाढव्य घोषणा केली. दोन हजार कुटुंबांना प्रत्येक 10 लाख यानुसार जवळपास 2 अब्ज रुपये देण्यात येणार आहेत.
Telangana CM K Chandrashekar Rao
announces that the state govt will give Rs.10 lakhs to all 2000 families living in village Chintamadaka; says,”I was born in this village of Siddipet District & I owe to the public of Chintamadaka village. I will sanction the amount immediately.” pic.twitter.com/t7Ioy5gmDB— ANI (@ANI) July 22, 2019
KCR यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, चिंतामडका गावातील तरुण कोणत्या उद्योगातून कमाई करु इच्छित असतील, तर त्यांना आवश्यक ती मदत करा. इतकंच नाही तर कामाच्या शोधात गावं सोडून गेलेल्या नागरिकांनाही परत बोलवण्यास केसीआर यांनी बजावलं आहे.
या घोषणेदरम्यान केसीआर यांच्यासोबत त्यांचा भाचा आणि सिद्दीपेट मतदारसंघाचे आमदार हरीश राव आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गावातील 2000 कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख आणि घर बांधून देण्याचा आदेश केसीआर यांनी दिला. केसीआर यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 400 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
स्वयंरोजगार योजनेतून सर्व कुटुंबांसाठी आर्थिक मदतीपोटी 200 कोटींचा खर्च होईल, तर उर्वरीत 200 कोटी रुपये घरं, हॉटेल आणि रस्ते विकासावर खर्च करण्यात येणार आहेत. जी आर्थिक मदत दिली जाणार आहे, ती ट्रॅक्टर खरेदी, डेअरी उद्योग यासारख्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 179 शेतकऱ्यांनी मिळून हरवलं
तीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य प्रकल्पाचा शुभारंभ, महाराष्ट्राला फायदा काय?