पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीवरुन भाजप आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. माझा घराणेशाहीविरोधात लढा आहे. भाजपच्या बारामतीच्या उमेदवार कांचन कुल आणि आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या नातेवाईक आहेत. ही लोकशाही थट्टा आहे. लोकशाहीत कुटुंबशाही नको, असं आवाहन आंबेडकर यांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि कुल यांचं नातं सांगावं, दोन्ही नातेवाईक आहेत, लोकशाहीचा तमाशा थांबवावा आणि लोकशाहीची थट्टा थांबवा, असंही त्यांनी म्हटलंय.
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादी निवडणुकीआधी काडीमोड घेते आणि निवडणुकीनंतर गंधर्व विवाह करते, असा आरोप आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी सेक्युलर नाही, मात्र आम्हाला बी टीम म्हणत आहे. नालायकांना लाज वाटली नाही, असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात ते वडगावला बारामती मतदारसंघातील उमेदवार नवनाथ पडळकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. मात्र सभेला बोटावर मोजण्याएवढी गर्दी होती. प्रकाश आंबेडकर यांनी या सभेत घराणेशाहीवर टीका केली.
वाचा – सुनेत्रा अजित पवार यांचे सहा नातेवाईक लोकसभेच्या रिंगणात
सत्ताधारी मुंबई हल्ल्यातील बलिदानाची टिंगल करत आहेत. भाजपने साध्वीच्या विरोधात काही भूमिका घेतली का? भाजप बलिदान व्यर्थ घालवत आहे. ज्या भाजपने बलिदान देणाऱ्यांना शिवी दिली, त्यांना पोलिसांनी मतदान करु नये, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रकाश आंबेडकरांनी जहरी टीका केली. पंतप्रधान खोटारडा असून कोणत्या आधारावर साध्वीला तिकीट दिलं? याचा मुख्यमंत्री यांनी खुलासा करावा. शहिदांचा सन्मान करण्याऐवजी अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान खोटं बोलत आहेत. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या दाव्यात उघड झालंय. अमेरिका म्हणते आम्ही पाकला दिलेली विमानं मिसिंग नाही. अमेरिका खोटं बोलत आहे हे दाखवा, विमानं पाडल्याचे फोटो दाखवा, खोटारड्या सरकारला सत्तेवर बसवू नका, असं आवाहन आंबेडकर यांनी केलंय.