मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला अखेर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटच्या बैठकीत एकूण पाच निर्णय (Thackeray Cabinet Ministry Decisions) घेण्यात आले.
ठाकरे सरकारचं खातेवाटप अद्याप झालेलं नसलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. यामध्ये समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेला केराची टोपली दाखवण्यात आली आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महामार्गाला देण्यात आलं.
ठाकरे सरकारच्या कॅबिनेटमधील पाच निर्णय
1. राज्यातील दुय्यम न्यायालयातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मान्यता.
2. महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून 5 हजार 350 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता.
3. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय.
4. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी.
5. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही महसुली अधिकाऱ्यास आता अधिकार. अध्यादेशाचे अधिनियमात रुपांतर करण्यास मान्यता.
समृद्धी महामार्ग नामकरणावरुन वाद काय?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. तेव्हाच महामार्गाच्या नामांतरावरुन युतीत वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली होती.
देशातील पहिल्या वहिल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र वाजपेयींचं नाव देण्याची घोषणा झाल्यामुळे आता दबावाचं राजकारण नको, अशी तंबी फडणवीसांनी दिल्याचं म्हटलं गेलं.
महाराष्ट्राच्या वाट्याचे 15 हजार कोटी तात्काळ द्या, उद्धव ठाकरेंचं केंद्राला पत्र
जवळपास 56 हजार कोटी रुपये खर्चून मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे.
Thackeray Cabinet Ministry Decisions