मोठी बातमी ! विदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पडणार, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, काँग्रेसचे माजी आमदार शिंदे गटात येणार

| Updated on: Nov 11, 2022 | 11:29 AM

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय यात फरक आहे. शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मोठी बातमी ! विदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पडणार, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, काँग्रेसचे माजी आमदार शिंदे गटात येणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: शिवसेनेतून आधी 40 आमदार आणि नंतर 12 खासदार फुटल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचे विदर्भातील जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात येणार आहेत. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे येत्या हिवाळी अधिवेशनातच ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मीडियाशी संवाद साधताना हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. विदर्भातील ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी शिंदे गटात येणार आहेत. या शिवाय विदर्भातील ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुखही शिंदे गटात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

तुमाने यांनी काँग्रेसचे माजी आमदारही शिंदे गटात येणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे कोणते माजी आमदार शिंदे गटात येणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी फूट पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हिवाळी अधिवेशनावेळी विदर्भात पूर्व विदर्भाचा मेळावा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 8 जिल्हाप्रमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करतील. शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि काँग्रेसला दिलेला मोठा धक्का असेल असं त्यांनी म्हटंल आहे.

यावेळी तुमाने यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय यात फरक आहे. शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास वाढला आहे. म्हणूनच आता आमच्याकडे इनकमिंग सुरू होणार आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, तुमाने यांनी विदर्भातील कोणते 8 जिल्हाप्रमुख येणार याची माहिती दिली नाही. त्यामुळे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणारे ते जिल्हाप्रमुख कोण? याची कुतुहूलता सर्वांनाच लागली आहे. तसेच काँग्रेसचे कोणते माजी आमदार शिंदे गटात येणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे.