मुंबई : ठाकरे सरकारचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल (Thackeray Government Ministry Changes) करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी ठाकरे सरकारचं खातेवाटप घोषित केल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आता खातेबदल झाला आहे.
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. म्हणजेच भुजबळ आणि जयंत पाटलांच्या काही खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. अर्थात अदलाबदल झालेली खाती दोघांकडे कायमस्वरुपी राहणार की तात्पुरती, हे अद्याप अस्पष्ट आहे. तसंच या बदलांमागील कारणही समजू शकलेलं नाही.
बदलानंतर कोणाकडे कोणती खाती? (Thackeray Government Ministry Changes)
छगन भुजबळ (07)
ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण
जयंत पाटील (07)
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
एकनाथ शिंदे (10)
गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
सुभाष देसाई (12)
उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये आणि राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
बाळासाहेब थोरात (05)
महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय (पदुम).
नितीन राऊत (06)
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये केले बदल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली मान्यता १/२
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019
मंत्रिमंडळ खात्यातील बदल खालीलप्रमाणे
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. @Jayant_R_Patil यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री.@ChhaganCBhujbal यांच्याकडे देण्यात आले आहे. २/२— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019
हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार (Thackeray Government Ministry Changes) होण्याची शक्यता आहे.