मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप आज (गुरुवार 2 जानेवारी) दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. मंत्रालयात चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिती दिली. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबत तिन्ही पक्षांत एकमत झालं असून खातेवाटपाचा तिढाही सुटला (Portfolio of Ministers Decided) आहे.
पालकमंत्र्यांबाबत एकमत झाल्याने खातेवाटप जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुपारपर्यंत खातेवाटपाचा जीआर
निघण्याची शक्यता आहे. मॅरेथॉन बैठकीनंतर खातेवाटपावर तोडगा निघाला. मंत्रालयात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली.
खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीत वाद सुरु असल्यामुळे मंत्र्यांना खाती जाहीर करण्यात येत नसल्याची चर्चा होती. मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या तिन्ही पक्षातील आमदारांनी नाराजीचे झेंडेही उभारले होते. प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं होतं, तर संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी राडा केला होता. खासदार संजय राऊत यांचे आमदार बंधू सुनिल राऊतही मंत्रिपद न मिळाल्याने खट्टू असल्याची चर्चा होती.
उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांना ‘तो’ शब्द दिला असावा : सामना
दुसरीकडे, मंत्रिपद जाहीर झालेल्या आमदारांच्या संभाव्य खात्यांची नावंही चर्चेत होती. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय, छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याचे संकेत ‘सामना’तून देण्यात आले होते. संभाव्य मंत्रिपदावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चा निरर्थक असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
मंत्री आणि त्यांची खाते आणि पालक मंत्री यांची घोषणा होईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या वाटेला आलेल्या मंत्रिपदं आणि मंत्र्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम (Portfolio of Ministers Decided) दिला.