औरंगाबाद : ठाकरे सरकारमधील शिवसेना मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. (Thackeray Government Shivsena Minister Abdul Sattar tested Corona Positive)
मुंबईतील लीलावती रुग्णालयात अब्दुल सत्तार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर काल सायंकाळी सत्तार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने अब्दुल सत्तार यांच्यावर घरीच उपचार होणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल, असे ट्वीट अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार 2019 मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास आणि बंदरे विकास मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचा झेंडा हाती धरला. 2014 पर्यंत आघाडी सरकारच्या काळातही ते मंत्री होते.
हेही वाचा : सिंधुदुर्गातील शिवसेना आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण
सत्तार हे 2009 पासून सलग तिसऱ्यांदा औरंगाबादमधून आमदारपदी निवडून आले आहेत. सध्या त्यांच्याकडे धुळ्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही आहे.
थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही,कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) July 21, 2020
आमदार-मंत्री यांना कोरोना
सिंधुदुर्गातील शिवसेनेचे बुलंद नेते आणि आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले आहे. तर नाशिकमधील शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोना झाला आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर राज्यसभा खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनाही कोरोना झाला आहे.
ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही कोरोनावर मात केली.
(Thackeray Government Shivsena Minister Abdul Sattar tested Corona Positive)